आमदार गायब झाल्याच्या बातम्या आल्या उध्दवजींचा फोन आला! सुनील प्रभूंची साक्ष

मुंबई – शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी आज दुसर्‍या दिवशीही ठाकरे गटाचे तत्कालीन प्रतोद सुनील प्रभू यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर उलटतपासणी झाली. आमदार गायब झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या, रात्री 10.30 वाजता उध्दवजींचा फोन आला, त्यांनी बैठक बोलवायला सांगितली, मग मी व्हिप काढला, तेव्हा विधान परिषद निवडणूक निकाल लागून 3 तीन तास झाले होते, अशी माहिती सुनील प्रभू यांनी साक्षीवेळी दिली. त्यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी त्यांना उलटसुलट असंख्य प्रश्न विचारले.
शिंदे गटाचे आमदार संपर्कात नव्हते हे केव्हा कळले, व्हीप कोणाच्या सांगण्यावरून बजावला, कसा बजावला, स्वत:च्या अधिकारात व्हीप बजावला का, व्हिपवर तुम्ही सही केली का अशी प्रश्नांची सरबत्ती शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केली. प्रभूंनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र आरोपी असल्याप्रमाणे प्रश्नांची सरबत्ती केल्याने सुनील प्रभू यांनी नाराजी व्यक्त केली. मी साक्ष देत आहे, आरोपी नाही, असे ते जेठमलानींना म्हणाले. 24 नोव्हेंबर पर्यंत या प्रकरणी सलग सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठली होती. 2022 च्या जूनमध्ये झालेल्या या सत्तासंघर्षातील नाट्यमय घडामोडींचा पट आज विधानसभेच्या सभागृहात पुन्हा उलगडला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर 16 आमदारांच्या अपात्रतेसंबंधीच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या याचिकांवरील सुनावणी नियमितपणे सुरू झाली आहे. काल ठाकरे गटाचे तत्कालीन प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. आज त्यांची फेरसाक्ष म्हणजेच उलटतपासणी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी घेतली. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेली ही सुनावणी सायंकाळपर्यंत सुरू होती. सुनील प्रभूंनी शिंदे गटाच्या आमदारांना बजावलेला व्हिप आणि तो नाकारल्यामुळे त्यांच्यावर ठाकरे गटाने केलेली अपात्रतेची कारवाई हाच या एकूण सुनावणीतील कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे या व्हिपसंदर्भातच आज जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.
ठाकरे गटाचे तत्कालीन प्रतोद सुनील प्रभू यांनी 20 जून 2022 ला आमदारांना विधीमंडळ सदस्य बैठकीला उपस्थित राहण्याचा व्हिप बजावला होता. व्हिपवर मात्र तारीख 21 जूनची होती. ही तारीख वेगळी कशी? तुम्ही स्वत:च्या अधिकारात व्हिप बजावला होता का? कोणाकोणाला बजावला? पत्र कोणत्या आमदारांच्या हाती दिले? कोणाला दिले नाही? बैठक बोलवा अशा सूचना लेखी मिळाल्या की तोंडी? व्हिप बजावला तेव्हा तुम्ही कुठे होता? असे अनेक उलटसुलट प्रश्न विचारत शिंदे गटाचे वकील राम जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
सुनील प्रभूंनी जेठमलानी यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की आमदार गायब झाल्याच्या बातम्या येत होत्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर विधीमंडळ सदस्यांची बैठक बोलावली. 20 जून 2022 रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान उद्धव ठाकरे यांचा फोन मला आला. मी तेव्हा विधानभवनातच होतो. तातडीने बैठक बोलावण्याच्या सूचना मला फोनवरून मिळाल्या. विधान परिषदेत आमचा एक आमदार पराभूत झाला होता त्याचीही माहिती घ्यायची होती. त्यानंतर व्हिप तयार केला. मी पक्षाचा प्रतोद म्हणून व्हिप बजावला. व्हिप तयार करून त्यावर सही केली की पक्ष कार्यालयातील कर्मचारी आमदारांना व्हिप देतात. काही आमदार संपर्कात नव्हते. जे संपर्कात नव्हते त्यांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे व्हिप पाठवला. विधानसभेत त्या दिवशी हजर असलेल्यांना प्रत्यक्ष व्हिप दिला. त्यांची पोचपावतीवर सही आहे. पोचपावतीवर सह्या आहेत अशा 12 आमदारांनी नावे प्रभूंनी
वाचून दाखवली.
दुसरीकडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीच्या धीम्या गतीसंदर्भात आज नाराजी व्यक्त केली. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवर आज भाष्य केले. ते म्हणाले की सुनावणी ठराविक वेळेत घ्यायला हवी होती. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजाचे नाव देशात घेतले जाते पण भाजपाने घाणेरडे राजकारण करत या लौकिकाला कलंक लावला आहे. विधानसभा अध्यक्षांवर सुप्रीम कोर्टाला ताशेरे ओढावे लागले ही कलंक लावणारी बाब आहे. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचे पावित्र राखले पाहिजे. लोकसभा अध्यक्षपदाचे नेतृत्वही महाराष्ट्राने केलेले आहे पण आज जे चालले आहे ते बरोबर नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मी आज आमदार आहे असे प्रभू यांनी सुनावणीवेळी म्हटले तर तो नामोल्लेख सुद्धा कामकाजात येऊ द्यायचा नाही असे कामकाज होत असेल तर फारच चुकीचे आहे. अशा राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत असेल तर आयुधांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे व आम्ही या प्रश्नी अधिवेशनात प्रश्न विचारू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top