आष्टी तालुक्यात पैशाच्या वादातून सुट्टीवर आलेल्या सैनिकाची हत्या

बीड – जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात सुट्टीवर आलेल्या सैनिकाची हत्या झाली. प्रवीण विनायक पवार (३९) असे मृत सैनिकाचे नाव आहे. प्रवीण व त्यांचा लहान भाऊ विनोद यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता. यात प्रवीणला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे घडली.
प्रवीण हे झारखंड येथे सीआरपीएफ मध्ये नोकरीला असून मागील पंधरा दिवसांपासून सुट्टीवर गावी आले होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रवीण व त्यांचा लहान भाऊ विनोद यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. यात प्रवीणला बेदम मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु मारहाणीत जखम झाल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी रूग्णालयात जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी प्रवीण यांच्या पत्नी सीमा पवार यांच्या फिर्यादीवरून सासू झुंबरबाई पवार, सासरे विनायक पवार, भावजय सोनाली पवार, दीर विनोद पवार यांच्याविरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विनोद पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top