इंडियाचे जहाज खडकावर आदळले ! निमंत्रक होण्यास नितीश यांचा नकार

नवी दिल्ली- विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे जहाज सुरू झाल्यापासूनच भरकटले आहे. नरेंद्र मोदींच्या चेहर्‍यासमोर तोडीस तोड चेहरा देण्याबाबत आघाडीत एकमत होताना दिसत नाही. आज इंडियाच्या ऑनलाईन बैठकीतही हेच चित्र दिसले. जागावाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच निमंत्रकपदावरून चर्चा अडली. काँग्रेसने निमंत्रक पदासाठी नितीश कुमारांचे नाव सुचवले, पण नितीश कुमारांनीच निमंत्रक होण्यास नकार दिला आणि इंडियाचे भरकटलेले जहाज आज खडकावर आदळले.

इंडिया आघाडीची आज आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने बैठक झाली. ही बैठक दोन तास सुरू होती. आघाडी मजबूत करण्यासाठी, जागावाटपाची रणनीती ठरवण्यासाठी आणि आघाडीचा निमंत्रक ठरवण्यासाठी प्रामुख्याने या बैठकीत चर्चा झाली. 28 पक्षांपैकी दहा पक्षांचे नेते या ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी, महासचिव के.सी. वेणुगोपाळ, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालुप्रसाद यादव, तेजस्वी यादव, संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सीपीआयचे डी. राजा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येच्युरी, द्रमुकचे एम. के. स्टॅलिन, आपचे केजरीवाल, आरएलडीचे जयंत चौधरी, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला या बैठकीसाठी उपस्थित होते. उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव बैठकीला अनुपस्थित होते. ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे बैठकीला उपस्थित राहता येणार नाही असे कारण दिले होते.

लोकसभेच्या जागावाटपा-बाबत चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीच्या निमंत्रकपदी नितीश कुमार यांची निवड व्हावी, असा प्रस्ताव काँग्रेस पक्षाने दिला. मात्र नितीश कुमारांनी निमंत्रक होण्यास नकार दिला. काँग्रेसमधील एखाद्या मोठ्या नेत्याने निमंत्रक व्हावे आणि त्यांनीच जागावाटपाबाबत चर्चा करावी, असे नितीश कुमारांचे म्हणणे होते. जागावाटप हेच सर्वात मोठे आव्हान आहे, असे नितीश कुमार म्हणाले. बैठकीत मोठ्या पक्षांचे नेते सहभागी झाले नाहीत, हे चांगले संकेत नसल्याचेही नितीश म्हणाले. नितीश यांचा रोख ममता बॅनर्जी यांच्याकडे होता. ममता बॅनर्जी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण देत या बैठकीला अनुपस्थित राहिल्या. काँग्रेसने बैठकीचा अजेंडा सांगितला नाही. अगदी कमी अवधीवर बैठकीची सूचना मिळाली, असे ममतांनी सांगितले. पण प्रत्यक्षात नितीश यांना आघाडीचे निमंत्रक बनवण्यावर ममतांची सहमती नसल्याचे म्हटले जात आहे. मागील बैठकीत ममता आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी केली होती.

इंडियाच्या पहिल्या बैठकीचे निमंत्रक नितीश कुमार होते. पण त्यानंतर ते पुढील बैठकांमध्ये बाजूला पडले. त्यांनी निमंत्रक बनण्यास अनेक पक्षांनी विरोध केला. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. इंडियाच्या दिल्लीतील मागील बैठकीत ते आजारपणाचे कारण देत अनुपस्थित राहिले. त्यांच्याच बिहारमध्ये जागावाटपावरून आघाडीचे एकमत झालेले नाही. नितीश कुमार 16, काँग्रेस 9 आणि राष्ट्रीय जनता दल 9 जागांवर हटून बसल्याने तेथे जागावाटपवरून तणाव आहे. बिहारच्या लोकसभेच्या 40 जागांसाठी सहा सहयोगी पक्षांनी दावा ठोकला आहे. या सर्व घडामोडींमुळे नितीश कुमार अधिकच नाराज झाले. त्यांच्या पक्षांतर्गत बंडालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदी राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची तशी निवडही झाली. आज त्यांनी निमंत्रक व्हावे हा काँग्रेसचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला. त्यामुळे आजही निमंत्रकाचा निर्णय झाला नाही. आज केवळ इंडियाचे अध्यक्ष म्हणून खरगे यांची निवड झाली.
शरद पवार यांनी या बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की, इंडिया आघाडीचे नेतृत्व मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वीकारावे, अशी सूचना काही सहकार्‍यांनी केली. त्याला अनेकांनी संमतीदेखील दिली. संयोजक म्हणून नितीश कुमारांनी जबाबदारी घ्यावी अशी सूचना करण्यात आली होती. परंतु संयोजक पदाची गरज नसल्याचे मत नितीश कुमारांनी मांडले. त्यामुळे संयोजक पदाची नियुक्ती करण्यात आली नाही. या बैठकीत जागावाटपासंदर्भात काही निर्णय झाला नाही. जागावाटपाच्या संदर्भात काही वाद आहेत, ते मिटवले जावेत याबाबत बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधानपदाचा चेहरा असण्याची गरज नाही असे इंडिया आघाडीचे मत असल्याने ती निवड होणार नाही. एकंदरीत कोणताही ठोस निर्णय न घेता आजचीही बैठक संपली. भाजपाने एकीकडे प्रचारही सुरू केला आहे, दुसरीकडे इंडियाचे मूळ निर्णयही होत नाहीत. दरम्यान, भाजपाने नितीश कुमारांसह इंडियाच्या बैठकीवरही टीका केली. नितीश कुमारांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही, ते आघाडी काय सांभाळणार, असा टोला भाजपाने लगावला. तर आभासी आघाडी आभासीच बैठक करणार अशी टीका भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top