इराणकडून मालवाहतूक बोटीचे अपहरण! १७ भारतीय बोटीवर

तेहरान

इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डच्या कंमाडोंनी होर्मुझच्या समुद्रधुनीवर इस्रालयच्या खाजगी मालवाहतूक बोटीचे अपहरण केले. या बोटीवर १७ भारतीय उपस्थित होते. हे जहाज संयुक्त अरब अमिरातीहून (यूएई) भारताकडे येत होते. जहाजाचे अपहरण झाल्याच्या वृत्तानंतर केंद्र सरकारने तातडीने इराण सरकारशी संपर्क साधत भारतीयांच्या सुटकेची मागणी केली. जहाजाच्या अपहरणाच्या वृत्तानंतर इराण आणि इस्रायलमधील तणाव अधिक वाढला आहे.

मालवाहतूक जहाज संयुक्त अरब अमिरातीच्या खलिफा बंदरावरून भारताच्या दिशेने येत होते. मुंबईतील न्हावा शेवा येथील नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे हे जहाज येणार होते. या दरम्यान हेलिकॉप्टरच्या मदतीने काही कमांडो जहाजावर उतरले. त्यांनी जहाजावर ताबा मिळविला. जहाजावर एकूण २५ कर्मचारी होते. त्यातील १७ भारतीय आहेत. या जहाजावर पोर्तुगालचा ध्वज आहे. जहाजाच्या अपहरणामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराण सरकारशी संपर्क साधला असून जहाजावरील १७ भारतीयांच्या सुटकेची मागणी केली आहे. भारतीय नागरिकांची सुरक्षा, कल्याण आणि सुटका सुनिश्चित करण्यासाठी तेहरान आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी राजनैतिक माध्यमांद्वारे इराणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या मालवाहतूक जहाजाचे अपहरण होण्याची शक्यता असल्याचा इशारा काल ब्रिटनच्या लष्कराने दिला होता. हा इशारा जारी केल्यानंतर काही तासांतच जहाजाचे अपहरण झाल्याचे सांगितले जात आहे.

इराण आणि इस्रायलमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. सिरियामधील इराणच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर इराणच्या हालचाली वाढल्या आहेत. इराण कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशामंधील परिस्थिती अत्यंत तणावाची आहे. त्यामुळे इराण आणि इस्रायल या देशांमध्ये जाणे टाळावे, असा सल्ला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. यासोबतच अमेरिकेसह काही देशांनी आपापल्या नागरिकांना इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. म्यानमारच्या सित्वे शहरातील सुरक्षाविषयक परिस्थिती अस्थिर असल्याने तेथील वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना यांगून शहरात हलवण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top