उंब्रज येथे दुसरा बिबट्याही जेरबंद

पुणे

जुन्नर तालुक्यातील उंब्रज येथे दुसऱ्या बिबट्यालादेखील जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. याबाबत वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी आज माहिती दिली आहे. काकडे यांनी सांगितले की, उंब्रज येथे आयुष शिंदे या मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी आयुषच्या घराच्या परिसरामध्ये १० पिंजरे आणि १० ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले होते. काल एक बिबट्या जेरबंद झाला तर आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.

जेरबंद करण्यात आलेल्या दोन्ही बिबट्यांना माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे. आयुषवर ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला होता, त्या ठिकाणी बिबट्याच्या पावलाचे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमातून ठसे घेण्यात आले. यानंतर पकडलेल्या दोन्ही बिबट्यांच्या पंजाचे ठसे घेतले जाणार आहेत. हे दोन्ही ठसे एकमेकांशी जुळवून पाहिले जातील. त्यातून कोणत्या बिबट्याने आयुषवर हल्ला केला हे समजू शकेल. दरम्यान, उंबज परिसरामध्ये अद्यापही ८ ते १० बिबटे आहेत असा अंदाज स्थानिक नागरिकांनी वर्तवला आहे. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी येथे शोध घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top