उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला विशाल पाटलांच्या आईचा आरोप

सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि शिवसेना, ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यात लोकसभा उमेदवारीवरून सुरू झालेली लढाई आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना, ठाकरे गट यांच्यातील या वादावर सध्यातरी तोडगा निघताना दिसत नाही.
विशाल पाटील यांच्या आई (वसंतदादा पाटील यांच्या सुनबाई) शैलजा पाटील ‘नवाकाळ’च्या प्रतिनिधीशी संवाद साधताना
हळव्या झाल्या.
तुमचे पुत्र विशाल पाटील लोकसभा उमेदवारी वरून महाविकास आघाडी बरोबर नाराज आहेत.
शैलजा पाटील –
नाराज आहेतच. कारण ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या घराण्याची अस्तित्वाची लढाई आहे. 1980 पासून 2014 पर्यंत आमच्या घरात खासदारकी होती. आधी वसंतदादा पाटील, नंतर शालिनीताई पाटील, माझे पती म्हणजे वसंतदादा पाटील यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील आणि त्यानंतर त्यांचे पुत्र प्रतिक पाटील अशी खासदारकी आमच्याकडे होती. सांगली हा नेहमी काँग्रेसचा गड राहिलेला आहे.
विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून तुम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती का ?
शैलजा पाटील –
नाही, मी विनंती करायला गेले नव्हते, ते सांगलीला आले होते. वसंतदादांच्या समाधीला नमस्कार करायला ते आले होते. माझी दोन्ही मुले प्रतिक आणि विशाल घरी नव्हते. मी उद्धव ठाकरे आले म्हणून समाधीच्या ठिकाणी गेले. मी काहीच बोलले नाही, फक्त नमस्कार केला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही सांभाळून घेऊ आणि नंतर त्यांनी शब्द फिरवला, ते जे बोलले ते विसरून गेले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वसंतदादा यांचे खूप चांगले संबंध होते.
शैलजा पाटील-
खूप चांगले संबंध होते. म्हणजे खूप मैत्रीचे होते. शिवसेना कधी काँग्रेस विरोधात सांगलीमध्ये उमेदवार देत नव्हती. तसा अलिखित नियमच होता. पण बाळासाहेबांच्या मुलाने वसंतदादांच्या नातवाला डावलले. त्यांनी इथे उमेदवार द्यायला नको होता. शिवसेनेची ताकद इथे इतकी नाही, पण तरीही उमेदवार दिला.
विशाल पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली का?
शैलजा पाटील-
गेले 10 वर्षे तो कार्यकर्ता उभारणीचे काम करतो आहे. त्यांनी खूप मेहनत केली. 8 ते 10 महिन्यांपूर्वी त्याला काँग्रेसने आश्वासितही केले होते. अचानक चक्र फिरली आणि शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला. ग्राऊंड लेवलला इकडे शिवसेना नाही. आता विशालने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे, प्रचार जोरात सुरू आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top