उबाठाच्या विरोधात सांगलीत विशाल पाटीलांची बंडखोरी सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार

सांगली – सांगलीच्या जागेवरून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद आज अखेर विशाल पाटील यांच्या बंडखोरीपर्यंत येऊन पोहोचला. विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी विश्वजित कदम, जयश्री पाटील यांच्यासह सांगलीतील काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी सुरुवातीपासून आग्रही होते. मात्र ही जागा उबाठाने स्वतःकडे खेचून घेतल्याने वाद विकोपाला गेला.
उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीचे जागावाटप अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच सांगली लोकसभा मतदारसंघातून कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली. विश्वजित कदम काँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींना दोन वेळा भेटून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आदी काँग्रेसच्या
महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनीदेखील सांगलीच्या जागेसाठी आग्रह धरला होता, पण उद्धव ठाकरे गट सांगलीवरील दावा सोडण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर 7 एप्रिल रोजी विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीत मविआचे अधिकृत जागावाटप जाहीर होईपर्यंत वाट पाहू असे ठरले.
मग गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 9 एप्रिल रोजी मविआचे जागावाटप जाहीर झाले आणि सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटाकडेच राहणार हे स्पष्ट झाले. तेव्हापासून सांगली काँग्रेसमध्ये असंतोष धुमसत होता. आज तो उफाळून बाहेर आला. विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी केली. त्याच्या स्वीय सचिवाने आज अपक्ष उमेदवारासाठीचे फॉर्म घेतले. आता ते सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी आधीपासूनच आग्रही असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही आक्रमक झाले. मिरजमधील काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव आज संमत करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रात फारशी ताकद नसलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आता विशाल पाटलांच्या बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top