उबाठा गटाने पहिली यादी जाहीर करताच काँग्रेस पक्ष आणि शरद पवार गट संतप्त

मुंबई – उबाठा गटाने आज 22 उमेेदवार देणार असे जाहीर करत 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ही यादी जाहीर होताच मविआतील घटकपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे संतप्त झाले आणि त्यांनी या यादीला जाहीरपणे विरोध केला. मुंबई, सांगली अशा अनेक जागांवर वाद सुरू झाले. त्यातच वंचित आघाडीने मविआ समवेत न येता जरांगे-पाटील यांच्याबरोबरच युती करून नवीनच खेळ सुरू केला. यामुळे प्रचारापूर्वीच मविआ फुटला अशी आज परिस्थिती निर्माण झाली.
उबाठा गटाने 17 आणि वंचितने 6 उमेदवारांची यादी आज जाहीर केल्याने काँग्रेस पक्षात नाराजी पसरली. सांगली, मुंबईतील धारावी, इतर काही जागांबाबत चर्चा सुरू असताना परस्पर उमेदवार जाहीर करणे योग्य नाही असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. ते पुढे म्हणाले की, अजूनही वेळ गेलेली नाही. उबाठा आणि वंचितने आमच्याबरोबर बसावे, अजूनही मार्ग निघेल, शिवसेनेने फेरविचार करावा.
सांगली मतदारसंघातून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने या मतदारसंघावर दावा ठोकणारे काँग्रेसमध्ये खळबळ माजली आणि काँग्रेसने उबाठाच्या उमेदवाराला जाहीरपणे विरोध केला. काँग्रेस नेते विश्‍वजीत कदम म्हणाले की, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असे ठरले नव्हते. शिवसेनेने हातकणंगलेची जागा लढवा. कोल्हापूरच्या जागेबाबत ठरले होते की, शाहू महाराज जो पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा सोडायची. त्यांनी काँग्रेस पक्ष निवडला. आम्हाला सांगली मतदारसंघ हवा आहे हे आम्ही खर्गे यांना कळविले आहे. विशाल पाटील यांची उमेदवारी ठरली आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, ही जागा आम्हाला मिळेल. पक्षश्रेष्ठींनी सांगितले तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायला तयार आहोत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, अंतिम निर्णय होणे बाकी असताना, चर्चा संपलेली नसताना उबाठाने उमेदवार जाहीर केले. उबाठाने आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यांनी पुनर्विचार करावा. वंचितने जो निर्णय घेतला तो भाजपाला मदत करणारा ठरेल. ठाकरे गटाने मुंबई उत्तर पश्‍चिम मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर केल्यावर काँग्रेसचे संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर विरोध करत वेगळी भूमिका घेण्याचे जाहीर केले आणि काँग्रेसला मुंबईत रस नाही का, असा सवाल विचारला.
उबाठाच्या यादीवर नाराज होऊन राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीही मुंबईतील निदान एक जागा मिळावी अशी मागणी करीत आंदोलन केले. शरद पवार हे कार्यालयात बैठक घेत असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ईशान्य मुंबईमधून राखी जाधव यांना उमेदवारी दिली जावी अशा घोषणांनी राष्ट्रवादीचे कार्यालय दणाणून सोडले. एकूणच उबाठाने विश्‍वासात न घेता परस्पर यादी जाहीर केली, असा सूर आज निघाला आणि मविआची एकजूट इथेच फुटते की काय असे वातावरण तयार झाले. काँग्रेसने नाराजी उघड केल्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, मविआ टिकूच शकत नाही. आता त्यांची पडझड सुरू झाली आहे.

उबाठा गटाची उमेदवारांची यादी
उद्धव ठाकरे गटाने जाहीर केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत- प्रा. नरेंद्र खेडेकर (बुलढाणा), संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम), संजोग वाघेरे-पाटील (मावळ), चंद्रहार पाटील (सांगली), नागेश पाटील (हिंगोली) चंद्रकांत खैरे (संभाजीनगर), ओमराजे निंबाळकर (धाराशीव), भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी), राजाभाऊ वाजे (नाशिक), अनंत गीते (रायगड), विनायक राऊत (सिंधुदुर्ग – रत्नागिरी), राजन विचारे (ठाणे), संजय दिना पाटील (मुंबई-इशान्य), अरविंद सावंत (मुंबई- दक्षिण), अमोल कीर्तिकर (मुंबई उत्तर – पश्चिम), अनिल देसाई (मुंबई दक्षिण मध्य) आणि संजय जाधव (परभणी).

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top