एकनाथ शिंदे मुख्य नेतेपदावर त्यासाठी शिवसेनेची घटना बदलली

नागपूर – शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणातील आजची सुनावणी नागपुरात सकाळी साडे आठ ते साडे अकरा वाजेपर्यंत पार पडली. आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष झाली. 18 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड झाली. शिवसेना पक्षाच्या घटनेत मुख्य नेतापद आहे का, असा प्रश्‍न शेवाळेंना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी विचारला. त्यावर शिवसेना पक्षाच्या घटनेत बदल करून एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी निवड केली, असे शेवाळेंनी सांगितले. शेवाळेंना आज 76 प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, मंगळवारपर्यंत सर्वांशी साक्ष पूर्ण होऊन 18 डिसेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत युक्तिवाद संपेल, अशी माहिती शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी दिली.
आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. आज विधिमंडळाचे कामकाज नसल्याने ही सुनावणी सकाळीच पार पडली. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची उलटतपासणी ठाकरे गटाचे वकील अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी घेतली. शिवसेना सोडून भाजपला साथ देण्याच्या मुद्यावरून देवदत्त कामत यांनी राहुल शेवाळे यांना प्रश्न केला. एकनाथ शिंदे यांनी आघाडीवर राहून पक्षाचे नेतृत्व केले नाही. पण स्वतःच्या मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपाटी शिवसेना पक्ष नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्ष व शिवसैनिकांना पणाला लावले हे खरे आहे का? असे कामत यांनी विचारता राहुल शेवाळे यांनी नाही असे उत्तर दिले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी 23 जानेवारी 2018 रोजी एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड केली, असा प्रश्‍न देवदत्त कामत यांनी केला. त्यावर मला तारीख आठवत नाही असे उत्तर राहुल शेवाळे यांनी दिले. 18 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदी निवड झाली आहे का? त्यावर 18 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून निवड झाल्याचे सांगितले. त्यावर शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता हे पद आहे का? असे विचारता शेवाळेंनी हो असे उत्तर दिले. शिवसेनेत मुख्य नेतापद आहे हे तुम्ही घटनेत दाखवू शकता का, असा प्रश्‍न देवदत्त कामतांनी केला तेव्हा मुख्य नेतेपदाची घटनादुरुस्ती केली, असे उत्तर राहुल शेवाळे यांनी दिले. घटना दुरुस्तीबद्दल विचारले असता ‘मॅटर ऑन रेकॉर्ड’ असे शेवाळे यांनी उत्तर दिले.
उध्दव ठाकरे हे नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे होते आणि पक्षात आजही उध्दव ठाकरे यांना मोठा पाठिंबा आहे हे खरे आहे का? या प्रश्नाचे उत्तर, नाही असे शेवाळेंनी दिले. शिवसेनेशी बेईमानी केली तर ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे अधिकार उध्दव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीने दिले आहेत आणि राष्ट्रीय कार्यकारिणी व शिवसेना पक्ष उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहे असा ठराव मांडण्यात आला होता त्यावेळी तुम्ही बैठकीला उपस्थित होतात. याकडे देवदत्त कामत यांनी लक्ष वेधले तेव्हा या ठरावाशी मी सहमत नाही, असे
शेवाळे उत्तरले.
आजच्या सुनावणीच्या सुरुवातीला शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी शेवाळेंची मराठीत साक्ष घेतली. पण कामत यांनी त्याला आक्षेप घेतला. मराठीत प्रश्न विचारण्यासाठी अध्यक्षांची अनुमती घेण्यात आली नसल्याचा ठाकरे गटाचा आक्षेप होता. अखेर अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अनुमतीने ही साक्ष मराठीत घेण्यात आली. साखरे यांनी विधिमंडळाबाहेर माध्यमांना माहिती देताना सांगितले की, काही प्रश्नांची उत्तरे योग्य वाटली नाही की ते (ठाकरे गटाचे वकील) परत परत तेच प्रश्न विचारतात. काही प्रश्न दिशाभूल करणारे असतात. त्यामुळे प्रक्रिया लांबते. आम्ही प्रक्रिया लवकर संपवण्यासाठी सहकार्य करत असताना ती लांबणे योग्य नाही. दरम्यान, मंगळवारपर्यंत सर्व साक्षी पूर्ण होतील आणि 18 ते 23 डिसेंबर या कालावधीत युक्तिवाद पूर्ण होतील, असेही साखरे यांनी सांगितले.
ठाकरे गटाच्या वतीने मराठीच्या प्रश्‍नावर प्रतिक्रिया देताना सुनील प्रभू म्हणाले की, मराठीवर आमचे खूप प्रेम आहे असे दाखवण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा सुरू आहे. मी स्वत: माझी साक्ष झाली तेव्हा मराठीतून उत्तरे देण्याची परवानगी मागितली होती. अध्यक्षांकडे तशी रितसर परवानगी मागावी लागते. कोणत्या भाषेत बोलू द्यावे, हा अधिकार अध्यक्षांकडे आहे.
राहुल शेवाळे यांच्या साक्षीवरही प्रभू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शिंदे गटाचे लोक खोटे बोलत आहेत. शिवसेनेची घटना 1999 सालची आहे. तेव्हा मुख्य नेता हे पद नव्हते. पण खोटे बोल पण रेटून बोल असे सुरू आहे. शेवाळे सुनावणीत जेवढे खोटे बोलतील तेवढे चांगलेच आहे. कारण तेवढे ते अडचणीत येतील.
काल झालेल्या सुनावणीत सकाळच्या सत्रात शिंदे गटाचे दिलीप लांडे तर दुपारच्या सत्रात आमदार योगेश कदम यांची उलटतपासणी ठाकरे गटाच्या वकिलांनी घेतली होती. आता सोमवारी होणार्‍या सुनावणीच्या वेळी आधी राहुल शेवाळे यांची साक्ष पूर्ण होईल. त्यानंतर सोमवारी शिंदे गटातील सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top