एलईडी मच्छिमारांवर कारवाई करा मुरुडचे स्थानिक मच्छिमार आक्रमक

मुरुड जंजिरा – बेकायेदशीर एलईडी मच्छिमारी’ करणाऱ्या परप्रांतियांची अरेरावी वाढत असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या जिवीताला धोका उत्पन्न होत आहे. काही दिवसांपूर्वी मुरुडच्या एका बोटीवरील मच्छिमारांना एलईडी मच्छिमारी करणाऱ्या बोटीतील खलाशांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे एलईडी मच्छिमारी करणाऱ्यांविरुद्ध शासनाने ताबडतोब कारवाई करून त्यांची खोल समुद्रातील मासेमारी बंद करावी, अशी मागणी मुरुडच्या स्थानिक मच्छिमारांनी केली आहे.
आक्षी अलिबाग येथील बेकायदेशीर एलईडी बोटधारकांनी परप्रांतीय खलाशांकरवी एकदरा येथील कस्तुरी नौकेच्या बोट मालकांसह खलांशाना बोटीत घुसून मारहाण केली व बोटीतील डिझेल व मासेमारी साहित्य लंपास करून पोबारा केल्याच्या घटनेचे मुरुड कोळी समाजात तीव्र प्रतिसाद उमटले आहेत.समुद्रात खुलेआमपणे एलईडीद्वारे मासेमारी करण्याचे प्रमाण रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समुद्रातील मासळीचे प्रमाण घटले असून पारंपरिक मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे.
एलईडी मासेमारीला बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करीत मासेमारी केली जात आहे. प्रशासनाकडून कारवाई होत असली तरी काही दिवसांत पुन्हा परिस्‍थिती जैसे थे होत असल्‍याचे मच्छीमारांचे म्‍हणणे आहे. त्यामुळे आता याविरोधात ट्रॉलर्सवर काम करणार्‍या खलाशांनी आंदोलन पुकारले आहे. एलईडी मासेमारी सुरू ठेवल्यास मासेमारीसाठी समुद्रात जाणार नाही, असा पवित्रा घेत खलाशांनी बड्या मासेमारांविरोधात एल्गार पुकारला आहे. यासंदर्भातमहाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे संचालक विजय गिदी म्हणाले की, एलईडी मासेमारीला बंदी आहे. तरीसुद्धा काही मंडळी बेकायदा मासेमारी करतात. एलईडी मासेमारीमुळे समुद्रातील मासळी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळीच सरकारने व प्रशासनाने यावर कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. लाखो रुपयाचा दंड भरूनदेखील पुन्हा एलईडी मासेमारी सुरु कशी होते ? पारंपरिक मासेमारी मध्ये विक्रीस योग्य मासळी पकडणारी जाळी वापरली जातात .परंतु एलईडी मासेमारी मध्ये बोटीच्या साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त मासळी मारली जाते. तसेच ठेवता येत नसल्याने पुन्हा मृत मासळी समुद्रात फेकली जाते अशाने मच्छिमार बांधवांचे व समुद्र संपत्तीचे मोठे नुकसान होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top