एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला पुन्हा विलंब

मुंबई- एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या निवृत्तीनंतर एसटी महामंडळाचे नियोजन पुन्हा ढासळले आहे. ७ ते १० या दरम्यान कर्मचाऱ्यांना वेतन देण्याच्या सुचना न्यायालयाने गठित केलेल्या समितीने दिल्या होत्या. मात्र, नोव्हेंबरची १० तारीख उलटूनही दिवस उलटूनही कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या घरखर्चाचे नियोजन बिघडले आहे.
चन्ने यांच्या निवृत्तीनंतर परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडे एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली. या बदलानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या नियोजनात अनेक अडचणी येत आहेत. यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकारी,कर्मचारी संघटनांकडून नियमित व्यवस्थापकीय संचालक अधिकारी नियुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच अद्याप वेतन मिळाले नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. येत्या २ दिवसांत वेतन होईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, वेतन न झाल्यास महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या वतीने एसटी महामंडळ प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top