ऑक्सफर्डमध्ये निपाह लसीची पहिली मानवी चाचणी

लंडन :

भारतातील केरळ राज्‍यासह आशियातील काही देशांमध्‍ये धुमाकूळ घालणार्‍या निपाह विषाणू विरूद्ध संभाव्य लसीसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात मानवी चाचणी सुरू झाली आहे.

विद्यापीठाच्या महामारी विज्ञान संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले की, आस्ट्राझेनेका फार्मा आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीच्‍या कोरोना लसासाठी वापरल्‍या गेलेल्‍या तंत्रज्ञानावर आधारितच ही लस आहे. निपाह विषाणूची लागल झालेला पहिला रुग्‍ण २५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम मलेशियामध्‍ये आढळला होता. यानंतर बांगलादेश, भारत आणि सिंगापूरमध्ये त्याचा उद्रेक झाला. आता या विषाणूविरूद्ध मानवी लसीसाठीच्‍या चाचणीत १८ ते ५५ वयोगटातील ५२ जण सहभागी झाले आहेत.

याविषयी डॉ इन-क्यू यून यांनी सांगितले की, निपाह विषाणूमध्‍ये महामारीची क्षमता आहे. आम्‍ही घेत असलेल्‍या लसीची चाचाणी ही या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी साधनांचा संच तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक पाऊल पुढे आहे. केंब्रिज येथील फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनी मॉर्डनाने २०२२ मध्‍ये यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जीच्‍या सहकार्याने निपाह विषाणू लसीची चाचणी देखील सुरू केली होती.

दरम्यान, केरळ राज्‍यात सप्‍टेंबर २०२३मध्‍ये निपाहचे रुग्‍ण आढळल्‍याने खळबळ उडाली होती. सहा रुग्‍ण आढळले यातील दोघांचा उपाचारावेळी मृत्‍यू झाला होता. निपाहचा संसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तीला ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या माहितीनुसारनिपाह संसर्ग झालेल्‍या रुग्‍णाला ४० ते ७५ टक्‍के मृत्‍यूचा धोका असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top