ओडिशातील महत्त्वाचे गोपाळपूर बंदर अदानीने 3 हजार कोटींना विकत घेतले

अहमदाबाद – गेल्या दहा वर्षांत झपाट्याने प्रगती करून देशातील उद्योग जगतात जबरदस्त मुसंडी मारणार्‍या अदानी उद्योग समूहाने आता भारताचे पूर्वेकडील प्रवेशद्वार मानले जाणारे ओडिशातील गोपाळपूर बंदरही विकत घेतले आहे. यासाठी अदानीने तब्बल 3,080 कोटी रुपयांचा सौदा केला आहे. देशात ये-जा करण्यासाठी असलेले बहुतेक सगळे हवाई आणि सागरी प्रवेशमार्ग अदानीच्या ताब्यात आहेत. त्यात आता गोपाळपूरची भर पडली आहे.
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन या अदानी उद्योग समूहातील कंपनीने गोपाळपूर पोर्ट्स लिमिटेड (जीपीएल) या कंपनीतील एस पी ग्रूपचा 56 टक्के, तर ओरिसा स्टीव्हडोअर्स लिमिटेडचा 39 टक्के हिस्सा विकत घेण्यासाठीचा सामंजस्य करार केला आहे. हा सौदा एकूण 3,080 कोटी
रुपयांचा आहे.
भारताच्या पूर्व किनार्‍यावर वसलेले गोपाळपूर हे रस्ते आणि रेल्वे मार्गांनी जोडले गेलेले भारतातील एक महत्त्वाचे बंदर आहे. गोपाळपूर बंदराची हाताळणी क्षमता खूप मोठी आहे. ओडिशा सरकारने 2006 मध्ये जीपीएल कंपनीला तीस वर्षांच्या करारावर हे बंदर कंत्राटावर दिले होते. करारामध्ये दर दहा वर्षांनी बंदराचा विस्तार करण्याची तरतूद आहे. लोह, खनिज, दगडी कोळसा, चुनखडी, इल्मेनाईट आणि अ‍ॅल्युमिनियम अशा खनिजांची वाहतूक करणारी मोठी जहाजे या बंदरातून ये-जा करतात. भारतातील खनिजांशी संबंधित उद्योग क्षेत्राला कच्चा माल पुरविण्यामध्ये गोपाचपूर बंदर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
बंदर हाताळणीचे कंत्राट जीपीएल कंपनीला देताना ओडिशा सरकारने या कंपनीला अनेक सवलतीही दिल्या आहेत. ज्यामध्ये बंदराचा विकास उद्योग क्षेत्राच्या मागणीनुसार करण्याची परवानगी हा कळीचा मुद्दा आहे. जीपीएल कंपनीला बंदराच्या विकासासाठी आधीच 500 एकर जमीन ओडिशा सरकारने दिली आहे. त्याव्यतिरिक्त आणखी जमिनीची गरज भासल्यास अतिरिक्त जमीन अधिग्रहीत करण्याचे अधिकारही जीपीएल कंपनीला बहाल करण्यात आले आहेत.
गोपाळपूर बंदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 शी थेट जोडलेले आहे. तसेच बंदरासाठी एक खास रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे. हा विशेष रेल्वेमार्ग चेन्नई-हावडा रेल्वे मार्गाला जोडलेला आहे. त्यामुळे बंदरातून कच्चा माल थेट कारखान्यांपर्यंत पोहोचवणे सुलभ होते. चालू वित्तीय वर्षात गोपाळपूर बंदरातून होणार्‍या एकूण उलाढालीमधून सुमारे 520 कोटींचा नफा होणे अपेक्षित आहे. अशा या अत्यंत लाभदायक बंदरावर आता अदानी समूहाने ताबा मिळवला आहे.
‘गोपाळपूर बंदराचा ताबा मिळाल्यामुळे अदानी पोर्ट्सची ताकद कित्येक पटीने वाढणार आहे. या बंदरामुळे ओडिशा आणि शेजारच्या राज्यांमधील खाणींमधून उत्खनन करण्यात येणारी खनिज थेट उद्योगांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. संपूर्ण भारतात आता अदानी पोर्ट्सचा वावर सहज सुलभ होणार आहे’,असे अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमी झोन या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी सांगितले.
अदानीची मक्तेदारी
मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल, लखनौचा चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटीचा लोकप्रिय गोपीनाथ बरदालय आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबईचा प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील महत्त्वाची विमानतळ सध्या अदानी समूहाकडे आहेत. अदानी पोर्ट्स यांच्याकडे गंगावरम बंदर (आंध्र प्रदेश), करईकल बंदर (पुद्दुचेरी), कृष्णपटणम बंदर (आंध्र प्रदेश), मुंद्रा बंदर (गुजरात), टुना टर्मिनल (गुजरात), दहेज बंदर (गुजरात), मारमागाव बंदर (गोवा), दिघी बंदर (महाराष्ट्र), धामरा बंदर (ओडिशा), कट्टुपल्ली बंदर (तामिळनाडू), एन्नोर टर्मिनल (तामिळनाडू), व्हिजिनिजम (केरळ) यांचे व्यवस्थापन आहे. याशिवाय अदानीची वीज कंपनीही जोरात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top