कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका

दोहा- कतारमध्ये हेरगिरीच्या कथित प्रकरणात ८ माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. कतारने ह्या ८ माजी भारतीय नोदल अधिकाऱ्यांची सुटका केली. नौदलांच्या सुटकेबद्दल भारतीय नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ८ पैकी ७ भारतीय अधिकारी भारतात परतले आहेत. आमच्या नागरिकांच्या सुटकेची आणि घरी परतण्याची परवानगी देण्याच्या कतारच्या निर्णयाचे आम्ही कौतुक करतो.
ऑगस्ट २०२२ मध्ये कतारने ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली. या सर्वांवर पाणबुडी प्रकल्पाची हेरगिरी केल्याचा आरोप असल्याचे सांगितले जात होते. एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर या माजी नौदल अधिकाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये कतारमधील कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात भारताने याचिका दाखल केली. त्यानंतर एका परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर ४ आठवड्यांत कतारने माजी नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा रद्द केली. कतारने काल रात्री या नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास त्यापैकी ७ जण मायदेशी परतले.
कतारमध्ये अटकेची कारवाई आणि नंतर फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांमध्ये कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश गोपालकुमार यांचा समावेश होता. कतारमधून मायदेशी परतल्यानंतर या आधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘आम्ही भारतात परतण्यासाठी सुमारे १८ महिने वाट पाहिली. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खूप आभार मानतो. मोदींनी केलेल्या वैयक्तिक हस्तक्षेपाविना आमची सुटका होणे शक्य नव्हते. आमच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रत्येक प्रयत्नासाठी त्यांचे आभार मानतो. भारत सरकारने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आमची सुटका झाली आहे.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top