काँग्रेसचे ५० ते ६० आमदार भाजपात जाण्याची शक्यता! माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा दावा

बंगळुरू- जनता दलचे (सेक्युलर) नेते तथा माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षातले ५० ते ६० आमदार फुटून भाजपात जाऊ शकतात आणि महाराष्ट्रात घडले तसे सत्ता परिवर्तन कर्नाटकात घडू शकते असा दावा केला आहे. काँग्रेस मधले एक मंत्री आहेत ज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचायचे आहे. त्यामुळे ते आणि त्यांच्यासह ५० ते ६० आमदार हे भाजपात जातील. सध्या त्या बड्या नेत्याची भाजपाशी चर्चा सुरु आहे असेही त्यांनी म्हटले.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये सारे काही आलबेल नाही. कर्नाटकचे सरकार कधीही कोसळू शकते. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ते असे पाऊल उचलतील आणि त्यानंतर कर्नाटकचे सरकार कोसळेल. त्या बड्या नेत्यावर असे आरोप आहेत की त्यातून वाचणे जवळपास कठीण आहे. त्यामुळे ते आणि त्यांच्या सोबतचे ५० ते ६० आमदार लवकरच भाजपाची वाट धरु शकतात, असा खळबळजनक दावा कुमारस्वामी यांनी केला. याबाबत बोलताना कुमारस्वामी यांना तो बडा नेता कोण, नाव काय, हे विचारले असता ते म्हणाले की, छोट्या नेत्यांकडून फोडाफोडी होत नाही. ही गोष्ट फक्त ज्यांची राजकारणात ताकद जास्त आहे तेच करु शकतात. एक बडा नेता आहे ज्याची भाजपाशी बोलणी सुरु आहेत. महाराष्ट्रात जसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आणि त्यानंतर तिथे जसे सत्तांतर झाले तशीच परिस्थिती कर्नाटकातही उद्भवू शकते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कर्नाटकात कधीही काहीही घडू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top