काजूचे उत्पादन घटले बियांचे भाग गगनाला

रायगड :

तळा तालुक्यातील बाजारपेठेत काजूबियांचा दर चढलेलाच असून, यावर्षी उत्पादनात घट झाल्याने बियांचे भाव गगनाला भिडले आहेत. तळा तालुका हा डोंगराळ भाग असल्याने या ठिकाणी आंबा, काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.

तालुक्यातील आदिवासी समाज हा जंगलातील रानमेवा विकून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. मार्च ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत तालुक्यातील आदिवासी बांधव काजूगर, आंबे, फणस, करवंद, जांभूळ, आदी रानमेवा विकून मिळालेल्या पैशांवर आपला उदरनिर्वाह करतात. हे काजूगर पावसाळा सुरू होईपर्यंत मिळत असल्याने गोरगरीब आदिवासी बांधवांच्या हाताला काम व पोटाची खळगी भरली जाते. मात्र यंदा तालुक्यातील विविध जंगलात लागलेल्या वणव्यांमुळे बहुतांश काजूची झाडे जळून गेली आहेत. परिणामी यावर्षी काजूचे उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत काजू बियांच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ८० ते १०० रुपये शेकडा दराने मिळणाऱ्या काजूच्या बिया यावर्षी १५० ते २०० रुपये शेकडाने विक्री करण्यात येत आहेत. यामुळे ग्राहकांना गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट दराने काजूच्या बिया खरेदी कराव्या लागत आहेत. तर काही ग्राहक काजूच्या बिया खरेदी करण्यास हात आखडता घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top