कालकाजी मंदिरात जागरण! चेंगराचेंगरीत 1 महिला ठार

नवी दिल्ली- दिल्लीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिरात काल मध्यरात्री बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक बी प्राक याचा जागरणाचा कार्यक्रम होता. त्याला पाहण्यासाठी खूप गर्दी जमली होती. त्याचवेळी कार्यक्रमाचे स्टेज कोसळले आणि चेंगराचेंगरी झाली. यात एक महिला ठार झाली तर 17 जण जखमी झाले. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती.
शनिवारी मध्यरात्री काली मातेच्या कालकाजी मंदिरात देवीचा जागर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला 1500 ते 1600 भाविकांची गर्दी जमली होती. आयोजकांनी व्हीआयपी कुटुंबांना बसण्यासाठी एक स्टेज तयार केले होते. मात्र क्षमतेपेक्षा जास्त लोक स्टेजवर चढल्याने कार्यक्रम सुरू असताना स्टेज कोसळले. या स्टेजला लागून आणि स्टेजखालीदेखील भाविक बसले होते. स्टेज कोसळल्यामुळे गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली. ज्यात अनेक भाविक जखमी झाले. या दुर्घटनेत स्टेजवरील एका महिलेचा बळी गेला. या महिलेला दोन भाविकांनी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक बी प्राक याला पाहण्यासाठी तिथे खूप गर्दी जमली होती. त्याचवेळी ही दुर्घटना झाली. याबाबत बी प्राकने सांगितले की, दुर्घटना झाली त्यावेळी कालकाजी मंदिरात मी गेलो होतो. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, जखमी झालेले सर्वजण लवकर बरे व्हावे. त्याचबरोबर असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी लोकांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. या मंदिरात जागरणाचा कार्यक्रम गेले 26 वर्षे होत आहे. परंतु तो आयोजित करण्यासाठी आयोजकांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तरीही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी आयोजकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 337/304 अ/188 अन्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 17 जण जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top