किशोरी पेडणेकर,राऊत, तेजस्वी, सोरेन! निवडणूक येताच ईडीची देशभर कारवाई

नवी दिल्ली- जनतेच्या हिताच्या योजनांचा पाऊस पडू लागला की, निवडणुका जवळ आल्या असे म्हणायचे दिवस आता मागे पडले आहेत. विरोधी पक्षांमधील एकेक नेते हेरून त्यांची ईडी, सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा मागे लागला की, निवडणुकीचे पडघम वाजू लागले हे ओळखावे अशी परिस्थिती आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारचे राजदचे नेते तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव यांची ईडी चौकशी सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आपचे अरविंद केजरीवाल यांनाही समन्सवर समन्स पाठवण्यात येत आहेत. महाराष्ट्रात ठाकरे गटाच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. आज ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची ईडी कार्यालयात चौकशी झाली. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने देशभर ईडीच्या कारवाईचे सत्र सुरू असल्याची चर्चा आहे.
झारखंडमधील कथित भूखंड घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अडकविण्याचा पध्दतशीर प्रयत्न सुरू झाला आहे. काल ईडीने त्यांच्या दिल्ली आणि रांची येथील निवासस्थानांवर धाडी टाकल्या होत्या. यावेळी त्यांची बीएमडब्ल्यू कार ईडीने जप्त केली होती. घोटाळ्याच्या पैशातूनच ही कार विकत घेतली आहे, असा दावा ईडीने केला आहे. आज ईडीच्या पथकाने सोरेन यांच्या दिल्लीतील घरातून 36 लाख रुपयांची रोकड सापडल्याची बोंब करण्यात आली आहे. सोरेन गेल्या शनिवारपासून ईडीच्या पथकासमोर येणे टाळत आहेत. काही तास ते नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत होती. त्यानंतर आज ते रांची येथे आले. तेथे पोहोचताच त्यांनी आपल्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाच्या सर्व आमदार आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. त्यांची पत्नी कल्पना सोरेन या देखील बैठकीला उपस्थित होत्या. झारखंडमधील सोरेन यांच्या शासकीय निवासस्थानाचा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, निवासस्थान, राजभवन आणि ईडी कार्यालयाच्या 100 मीटरच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे ईडीला पाठविलेल्या पत्रामध्ये सोरेन यांनी आपण 31 जानेवारी रोजी दिल्लीत स्वतःहून चौकशीला हजर राहू, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे उद्या ते चौकशीला हजर राहतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.सोरेन चौकशीला हजर राहिले तर त्यांची चौकशी करून त्यांना अटक केली जाईल, अशी शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. दरम्यान, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, अशी प्रतिक्रिया झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली आहे.
बिहारमध्ये जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची काल चौकशी केल्यानंतर आज ईडीने लालूंच्या मुलाची माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची चौकशी सुरू केली आहे. पाटण्यातील ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी त्यांना 19 जानेवारीला समन्स पाठवण्यात आले होते. त्यांच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर जमून शक्तिप्रदर्शन केले. दिल्लीचे मुख्यमंत्री आपचे अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळाप्रकरणी ईडी वारंवार समन्स पाठवत आहे. मात्र केजरीवाल अद्याप एकदाही ईडीसमोर चौकशीला हजर राहिलेले नाहीत. उलट ईडीचे समन्स बेकायदा असून, आपण लोकसभा निवडणुकीत उतरू नये, प्रचार करू नये म्हणून आपल्याला अटक करण्याचा भाजपाचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रातही कोरोना काळातील कथित खिचडी वाटप घोटाळ्यातील आरोपी संदीप राऊत यांची तर याच काळातील बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीच्या पथकाने आज पुन्हा चौकशी केली. पेडणेकर यांची साडेसहा तास तर संदीप राऊत यांची आठ तास चौकशी झाली. हे दोन्ही ठाकरे गटातील नेते आहेत. संदीप राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे भाऊ आहेत.आज चौकशीसाठी येताना संजय राऊत त्यांच्यासोबत आले होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संदीप राऊत ईडीच्या कार्यालयाजवळ दाखल झाले.त्यावेळी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले की माझ्या खात्यावर राजीव साळुंखे यांच्याकडून पाच ते सहा लाख आले आहेत. त्यासंदर्भात चौकशी होणार आहे. कोरोना काळात लोकांना जेवण दिले गेले, त्याबाबतचे हे प्रकरण आहे. हे राजकीय हेतूने प्रेरित आहे. संजय राऊत विरोधात बोलतात. त्यांना नमवायचे आहे. सूड घ्यायचा आहे. सूडाच्या राजकारणातून आपल्यावर आरोप केले जात आहेत. जे भाजपासोबत गेले ते उजळ माथ्याने वावरत आहेत.मात्र आम्हाला विनाकारण त्रास दिला जात आहे.
दरम्यान, ईडीने पाठविलेल्या समन्सनुसार किशोरी पेडणेकर ईडीच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता हजर झाल्या. त्याप्रसंगी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्यावर लावण्यात येत असलेले आरोप मला मुळीच मान्य नाहीत. कोरोना काळात मी महापौर होते हे खरे आहे. पण माझ्यासोबत काम करणारे अनेक जण होते. जनतेच्या पैशाचा हिशेब द्यावाच लागतो. मीही तो द्यायला तयार आहे. ईडीने जी कागदपत्रे मागितली होती ती मी आधीच सादर केली आहेत. पुन्हा मागितली तर मी पुन्हा द्यायला तयार आहे. चौकशीला मी सुरुवातीपासून सहकार्य करीत आहे. चौकशीतून सत्य नक्कीच बाहेर येईल याचा मला ठाम विश्वास आहे, असे पेडणेकर म्हणाल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top