कुणकेरी गावात ३० मार्चला हुडोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेरी गावात ३० मार्चला हुडोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या हुडोत्सव सोहळ्याला २९ मार्चला दुपारपासूनच सुरुवात होणार आहे. या सोहळ्यानिमित्त कुणकेरी गावात भाविकांची प्रचंड गर्दी होते. या कालावधीत कुणकेरी गावात १०० फुटी हुड्यावर चढणाऱ्या संचारित अवसरांच्या धरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. हुडोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग, गोवासह कर्नाटकातील भाविक देखील कुणकेरी गावात येतात.
हुडोत्सवानिमित्त कुणकेरीत शुक्रवारी दुपारी २ वाजता गाव रोंबाट सुटणार आहे. संध्याकाळी ६ वाजता हुड्याजवळ सामुदायिक नारळ फोडला जाईल. रात्री ९ वाजता घुमट वादनासह हुडा आणि होळीवर धूळ मारण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री १० वाजता गाव रोंबाट आणि रात्री ११ वाजता हुडा आणि होळीवर पेटत्या शेणी फेकून ढोल ताश्यासह भाभीचे रोंबाट आणले जाईल. यानंतर कवळे आणि पेटत्या मशाली घेत हुडा आणि होळीभोवती फिरण्याचा कार्यक्रम होईल. ३० मार्चला हुडोत्सवाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत ३० मार्चला सकाळपासूनच भावई देवीच्या निवासस्थानी आणि मंदिरात देवीची ओटी भरणे, नवस फेडणे इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. यानंतर दुपारी २ वाजता मांडावरून गाव रोंबाट सुटणार आहे. यावेळी पळसदळा येथे आंबेगावच्या श्री देव क्षेत्रपाल निशाणाची भेट होईल. त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्वर देवस्थानची निशाण भेट होऊन सर्वजण भावई मंदिराकडे येणार आहेत. सायंकाळी ४ वाजता हुड्याजवळ घोडे मोडणी व लुटुपुटूचा खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. या खेळांनतर सायंकाळी ५ वाजता हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाने हुडोत्सवाची सांगता होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top