कोरोनाचा नवा विषाणू म्हणजे चौथी लाट नव्हे! तज्ज्ञांचे मत

मुंबई- कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली असून कोरोना विषाणूच्या जेएन १ या नव्या उपप्रकारामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. २१ डिसेंबरपर्यंत देशभरात नवीन विषाणूची एकूण २२ प्रकरणे उघडकीस आली आहेत, मात्र सर्व रुग्णांमध्ये याची सौम्य लक्षणे आढळली आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून अनेक जण याला नवी लाट समजत आहेत, पण तज्ज्ञांचे मत पूर्णपणे भिन्न आहे. याला चौथी लाट म्हणायची गरज नाही. दोन-तीन आठवड्यांत हे सर्व काही सामान्य स्तरावर येईल, असे मुंबईतील मुंबई रुग्णालयाचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ.गौतम भन्साळी यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने नक्कीच चिंता वाढवली आहे पण, त्याला घाबरण्याची गरज नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) त्याचे ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून वर्गीकरण केले आहे. हा शेवटचा प्रकार नाही. भारतात जेएन १ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये फक्त सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. याबाबत डॉ.गौतम भन्साळी म्हणाले की, या आजारामध्ये सर्दी, खोकला, ताप यांचा समावेश आहे, पण याचा परिणाम खूपच कमी असेल. मला वाटत नाही की यामुळे कोणतीही लाट येईल. मुंबईत दहा रुग्ण आढळले आहेत. यात थोडीफार वाढ होऊ शकते. लस आणि बूस्टर डोसनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ओमिक्रॉन लाटेने संपूर्ण जगात उपद्रव माजवला होता. पण सध्या परिस्थिती अशी आहे की, मोठ्या संख्येने लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे लाट येणार नाही.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार आठवड्यात जगभरात साडेआठ लाख कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. त्यातील १,८०,००० रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यातील १,६०० आयसीयूमध्ये दाखल झाले आहेत. तर भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३,५०० वर पोहोचली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top