क्रिप्टोच्या सर्वात प्रसिध्द गुंतवणूकदाराला फसवणुकीच्या गुन्ह्यात मोठी शिक्षा

न्यूयॉर्क – क्रिप्टो करन्सीचा सर्वात प्रसिध्द गुंतवणूकदार सॅम्युअल बँकमन-फ्राईड याला गुंतवणूकदारांची ८ अब्ज डॉलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने २५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. सॅम्युअल हा जगातील सर्वात लोकप्रिय क्रीप्टो करन्सी प्लॅटफॉर्म असलेल्या एफटीएक्सचा मालक आहे. क्रिप्टो किंग म्हणून तो ओळखला जात होता. अब्जावधींच्या फसवणुकीमुळे एफटीएक्सचा फुगा फुटला असून सॅम्युअल प्रसिध्दीच्या शिखरावरुन रसातळाला गेला आहे.
सरकार पक्षाच्या वतीने सॅम्युअलला ४० ते ५० वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्याला पंचवीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ही शिक्षादेखील कमी करण्याची विनंती सॅम्युअलने न्यायालयाकडे केली होती. तसेच त्याने न्यायालयात माफीनाफा लिहून देण्याची तयारीही दर्शविली होती. मात्र न्यायालयाने त्याची चोर अशी संभावना करीत तो कोणत्याही माफीच्या लायक नाही, असे ठणकावून सांगितले.
गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केले जातील असे सॅम्युअलने न्यायालयात सांगितले होते. मात्र न्यायालयाने त्याच्या शब्दावर विश्वास ठेवण्यास नकार दिला.

सॅम्युअलच्या एफटीएक्स कंपनीचा जगात बोलबाला होता. कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली होती. त्यामुळे सॅम्युअल बँकमन-फ्राईड यशाच्या शिखरावर पोहोचला होता. एफटीएक्सच्या जाहिरातींमध्ये टॉम ब्रँडी, स्टार बास्केटबॉलपटू स्टिफन करी आणि कॉमेडियन लॅरी डेव्हिड यांच्यासारखे दिग्गज कलावंत झळकले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top