खासगी दूध संस्थांनी दुधाचे दर कमी केल्याने शेतकरी आक्रमक

बारामती :

खासगी दूध संस्थांनी पुन्हा दुधाचे खरेदी दर केल्याने शेतकरी संतापले आहेत. त्यामुळे आता शेतकर्यांनी या दूध संस्थांकडे दूध देण्याऐवजी बाहेरील दूध संस्थेला बोलावून दूध विक्री करण्याच्या पवित्रा घेतला आहे.

दूध संस्था १६ ऑक्टोबरपासून प्रतिलिटर तीस रुपये दराने दूध खरेदी करत आहेत. दूध संस्थांनी दोन महिन्यांमध्ये लिटरमागे चार ते पाच रुपये खासगी कमी केले आहेत. जुलैमध्येच राज्य शासनाने दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर ३४ रुपयांवर निश्चित केले होते. शासनाच्या या आदेशाला दोन महिने उलटत नाहीत, तोच शेतकर्‍यांचा विरोध असताना खासगी संस्थांनी दुधाचे दर कमी केले. शेतकर्‍याला या खासगी दूध संस्थांनी तयार केलेले पशुखाद्य घ्यायचा आग्रह करायचा आणि मनाला वाटेल तसे दुधाचे दर कमी करायचे अशी मनमानी आता चालणार नाही, अशा शब्दांत ठणकावत शेतकरी आता संघटित होण्याच्या दृष्टीने चर्चा करीत आहेत.

यंदा बारामतीमध्ये खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. शेतात पिके नाहीत, चारा कुठून आणायचा, जिवापाड सांभाळलेले पशुधन जगवायचे कसे, या विचारात शेतकरी असताना दुधाला वाढीव दर मिळण्याऐवजी दुधाचे दर कमी करण्यात आले आहेत. याचा सर्वांत जास्त फटका शेतकरीवर्गाला बसत आहे. एकीकडे पाण्याच्या बाटलीची तुलना दुधाच्या लिटरबरोबर करीत असणारे नेते आता मूग गिळून गप्प का, असा संतप्त प्रश्न कार्‍हाटीचे शेतकरी अरविंद साळुंके, मधुकर वाबळे यांनी विचारला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top