गाझातील युद्ध थांबवण्याचा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मंजूर

न्यूयॉर्क :

इस्रायल-हमास युद्धादरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने गाझामधील मानवतावादी मदतीसाठी युद्ध थांबविण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला.काल विशेष सत्रादरम्यान आणलेल्या ठरावाला १२ देशांनी पाठिंबा दिला, तर अमेरिका, रशिया आणि ब्रिटनने मतदानात भाग घेतला नाही.

नवीन ठरावात गाझा पट्टीतील मानवतावादी मदतीसाठी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय लहान मुलांसाठी विशेष संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, माल्टा देशाने मांडलेल्या या प्रस्तावात कोठेही इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आवाहन करण्यात आलेले नाही. तर, चीन आणि रशियाला मात्र तात्काळ युद्धबंदी हवी आहे.

याशिवाय दक्षिण-पूर्व आशियाई देशांची संघटना असलेल्या आसियानच्या संरक्षण मंत्र्यांनी काल मंत्रिस्तरीय बैठकीत इस्रायलला गाझावरील हल्ले त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. आसियान संरक्षण मंत्र्यांनी मानवतावादी मदतीसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्याचेही आवाहन केले आहे. दरम्यान, इस्त्रायली सैन्याने काल गाझातील सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयावर ताबा मिळवला. इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) सांगितले की, रुग्णालयाच्या तळघरात मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडली आहेत. यापूर्वी रुग्णालयात अनेक ठिकाणी हमासच्या दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयांमध्ये अजूनही अनेक ठिकाणी दहशतवादी असू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top