चंद्रावरील ‘शिवशक्ती’ स्थळाला आंतरराष्ट्रीय खगोल संघाची मान्यता

बंगळूरू – गेल्यावर्षी २३ ऑगस्ट रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने अभूतपूर्व कामगिरी करत महत्त्वाकांक्षी चंद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. इस्रोच्या या मोहिमेचे केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातून कौतुक झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे कौतुक करताना चंद्रयान-३ ज्या ठिकाणी उतरले, त्या लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ हे नाव दिले होते. आता आंतरराष्ट्रीय संघटनेने या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रयान-३ लँडिंग पॉईंटला म्हणजे स्थळाला ‘शिवशक्ती’ म्हटले जाईल, अशी घोषणा केली होती. तसेच चंद्रयान-२ च्या पाऊलखुणा ज्या बिंदूवर उमटल्या, त्याला ‘तिरंगा’ म्हटले जाईल. भारताच्या प्रत्येक प्रयत्नासाठी प्रेरणा म्हणून काम करेल. कोणतेही अपयश हे कोणत्याही गोष्टीची अखेर नसते याची आठवण करून देईल. शिवामध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे. तर शक्ती ते संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्याला देते. चंद्राचा हा शिवशक्ती बिंदू हिमालय आणि कन्याकुमारीशी जोडल्याची भावना असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. चंद्रयान-३ मोहिमेच्या ऐतिहासिक यशाच्या सात महिन्यांनी आता आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ म्हणजेच आययूएने पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या ‘शिवशक्ती’ या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आययूएने मंजूर केलेल्या ग्रहांच्या नावांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top