चाकणला कांद्याची आवक वाढली! उलाढाल ७ कोटी, ६० लाख रुपये

चाकण – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये बटाटा, हिरवी मिरची व कोबीचे भाव कडाडले आहेत. कांद्याची आवक वाढल्याने भाव गडगडले. बटाट्याची आवक वाढूनही भावात वाढ झाली. लसणाची आवक घटूनही भावात घट झाली. फळभाज्यांच्या बाजारात कोबी, वाटाणा व गाजराची किरकोळ आवक झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची आवक घटल्याने भाव तेजीत राहिले. जनावरांच्या बाजारात जर्शी गाईची संख्या घटूनही भाव स्थिर राहिले. बैल, म्हैस व शेळ्या – मेंढ्या यांच्या संख्येत वाढ होऊनही भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ७ कोटी, ६० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २० हजार ५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने वाढल्याने भावात १०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव १,८०० रुपयांवरून १,७०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक १,७५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ७५० क्विंटलने वाढून भावात २०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवरून २,२०० रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. लसणाचा कमाल भाव १७ हजार रुपयांवरून १६ हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३२५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ६५ क्विंटलने घटल्याने भावात वाढ झाली. हिरव्या मिरचीला ५ हजार रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top