चोर…कुत्रा! टक्कल फोडतो!लोणीकरांची शिवीगाळ

जालना- भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी आज खालच्या थराचे संवाद ऐकवले. या दोन नेत्यांत काही दिवसांपूर्वी जालना मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदावरून वाद झाला होता. या वादानंतरची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर हे राजेश टोपे यांना शिवीगाळ करत आहेत. या दोन माजी मंत्र्यांच्या या व्हायरल संभाषणाची जोरदार चर्चा होत आहे.
मागील आठवड्यात जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. बबनराव लोणीकर यांचा मुलगा राहुल लोणीकर यांना उपाध्यक्षपदी निवडून आणण्याचे आश्वासन टोपेंनी दिले होते. परंतु उपाध्यक्षपदी रावसाहेब दानवेंचे समर्थक भीमराव जावळे यांची वर्णी लागली. तर अध्यक्षपदी राजेश टोपे यांचे बंधू सतीश टोपेंची निवड करण्यात आली. यानंतर जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली उभ्या असलेल्या टोपे यांच्या गाडीवर लोणीकरांच्या समर्थकांनी दगडफेक केली होती, तर बबनराव लोणीकर यांच्या घरावर टोपे यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. राजेश टोपेंनी शब्द फिरवल्याचा राग मनात ठेवून लोणीकरांनी त्यांना फोनवरून कवित्व शब्दांत शिवीगाळ केली.
या ऑडिओ क्लिपमध्ये राजेश टोपे लोणीकरांना म्हणत आहेत की, अर्जुनराव (खोतकर) साक्षीदार आहेत. अर्जुनराव बोलले, मीही बोललो आणि (रावसाहेब) दानवेही बोलले. ते म्हणाले, भैय्यासाहेब आम्हाला काही अडचण नाही. पण, यावेळी पद आम्हाला दिले पाहिजे. तर, काय बोलणार आम्ही? आमचे एवढे टोकाचे भांडण झाले. पण त्यांनी ऐकले नाही. काल फोनवर बोललो आणि आज ते लग्नाला आले होते. तिथेही त्यांना म्हणालो की, मी लोणीकरांना शब्द दिला आहे. ते म्हणाले, आपण बोललो पहिल्यांदा बबनरावांना, ते आले नाहीत. ते चर्चेत नव्हते. मी म्हटले, ते काहीही असो, पण राहुलला उपाध्यक्ष करायचे आहे. तर मला वाटते, यावेळी पद सोडावे, पण ते म्हणाले, पुढल्यावेळी देऊ.
यावर बबनराव लोणीकर म्हणतात, भैय्यासाहेब राजकारण मोठे नसते. त्या उपाध्यक्षपदात काहीही नाही, आम्हाला माहितेय. पण तुम्ही शब्द दिला. अर्जुनरावांच्या बंगल्यावर तुम्ही बोलला, चर्चा केली. यावर राजेश टोपे त्यांना बोलतात, आपण शब्द पाळू, पण पुढच्यावेळी बघूना.
मात्र त्यावर आतापर्यंत शांत असलेले बबनराव लोणीकर अचानक उसळून त्यांना म्हणतात, अरे ह ** कडू तुझे टक्कल फोडतो. तू** टोप्या.. कडू** चोर कुत्रा..
दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी बबनराव लोणीकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘मी कोणतीही ऑडिओ क्लिप ऐकलेली नाही. अशी कोणती ऑडिओ क्लिप व्हायरल होत असेल, तर ती नक्कीच बनावट आहे. आमच्या तीन पक्षांची बैठक पार पडली होती. या बैठकीत काही किरकोळ वाददेखील झाले होते, पण माझा कोणत्याही ऑडिओ क्लिपशी संबंध नाही. ती ऑडिओ क्लिप खोटी आहे. मी कोणलाही शिवीगाळ केलेली नाही.’ राजेश टोपे यांनी या ऑडिओ क्लिप प्रकरणी अद्यापी प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु या ऑडिओ क्लिपवरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top