छत्रपती शाहू महाराज यांची पहिली मुलाखत माझ्यावर दबाव आणणे भाजपाला परवडणार नाही

करवीर नगरी कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरमधून लोकसभेची निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या चिन्हावर लढत असलेल्या शाहू महाराजांनी ‘नवाकाळ’च्या प्रतिनिधी नेहा पुरव यांच्याशी विशेष संवाद साधला. राजकारणापासून आत्तापर्यंत दूर असलेले शाहू महाराज पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पहिल्यांदाच निवडणूक लढत आहात, का घेतला हा निर्णय?
शाहू महाराज –
मी कधीही सक्रिय राजकारणात नव्हतो, पण नेहमी राजकीय वातावरण काय आहे याची दखल घेत होतो. जे जे उमेदवार निवडणुकीला उभे राहायचे ते प्रचाराला सुरुवात करण्याआधी माझ्याकडे येऊन जायचे, आशीर्वाद घेऊन जायचे. 2014 नंतर परिस्थिती बदलली, संविधान धोक्यात आले, हे लोकशाहीसाठी घातक आहे आणि म्हणूनच मी रिंगणात उतरायचा निर्णय घेतला. माझे खापरपणजोबा राजर्षी शाहू महाराज यांचा आदर्श माझ्यासमोर आहे.
कसा प्रचार सुरू आहे? जनतेचा प्रतिसाद कसा आहे?
शाहू महाराज –
माझ्या दोन्ही मुलांनी छत्रपती मालोजी राजे आणि संभाजी राजे आणि त्यांच्या पत्नी यांनी आपापली जबाबदारी वाटून घेतली आहे, आम्ही चर्चा करतो आणि ते चौघे जनतेत जातात, संवाद साधतात. लोकांचा प्रतिसाद तर उत्तमच आहे, जनताच प्रचार करते आहे. आम्ही जाऊ तिथे खूप प्रेमाने जनता पाठिंबा देते. आमच्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणे हा एक नवा अनुभव आहे, पण जनता पिढ्यान्पिढ्या आमच्या कुटुंबावर प्रेम करते आहे.
भाजपाने ही जागा खूप प्रतिष्ठेची केली आहे, गृहमंत्री अमित शहा यांचे सतत कोल्हापूर दौरे होत आहेत. दबाव पण आला का तुमच्यावर?
शाहू महाराज-
हो, मला कल्पना आहे, मोदींची पण सभा आहे, अमित शहांचे दौरे सतत होत आहेत, पण मी शांत आहे, संयमितपणे वागतो आहे. माझ्यावर कुठलाही दबाव आला नाही. कारण ते त्यांना परवडणारेच नाही, बूमरँग होईल. मी माझ्या पद्धतीने प्रचार करतो आणि मी त्यात समाधानी आहे.
कोणता प्रश्न खासदार झाल्यावर तुम्ही कोल्हापूरच्या जनतेसाठी महत्त्वाचा मानता?
शाहू महाराज-
संविधान आणि लोकशाही वाचवणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याचे रक्षण करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. कोल्हापूरच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत. त्यात बेरोजगारी हा एक मुख्य मुद्दा आहे. जनतेने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही हे नक्की.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top