जरांगेंची शिष्टमंडळासोबतची चर्चा निष्फळ! आझाद मैदानावर झेंडावंदन करणार!!

लोणावळा – मुंबईच्या वेशीवर आलेले भगवे वादळ रोखण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आजही अयशस्वी ठरले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारशी झुंज देणारे मनोज जरांगे-पाटील परवानगी नसतानाही मुंबईला धडक देण्यावर ठाम आहेत. आम्हाला सरकारसोबत चर्चा करून मराठा आरक्षणावर तोडगा काढायचा आहे. मात्र सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली. आम्ही सरकारला सहकार्य करू इच्छितो मात्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमु्‌‍ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात जातीने लक्ष द्यावे आणि तोडगा काढावा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी लोणावळ्यात माध्यमांशी बोलताना केले. मुंबईत येऊन उद्या आझाद मैदानावरच झेंडावंदन करण्यावर जरांगे ठाम आहेत.
आज सरकारचे शिष्टमंडळ लोणावळ्यामध्ये मनोज जरांगेंच्या भेटीला गेले होते. मात्र चर्चा पुन्हा एकदा निष्फळ ठरल्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार जरांगेंनी मुंबईची वाट धरली. तत्पूर्वी, आंदोलकांना लोणावळ्यातील सभेत मार्गदर्शन करताना जरांगे म्हणाले की, शांततेत आंदोलन करून आपल्याला इतिहास घडवायचा आहे. 70 वर्षे आरक्षण निर्णय प्रक्रियेत नव्हते, आता आपल्या आंदोलनामुळे आले आहे. आपल्याला आरक्षण हे ओबीसीतून घ्यायचे आहे. कोण मराठ्यांच्या विरोधात जातो त्याला नंतर बघू, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, शिस्त पाळा, एकजूट महत्त्वाची आहे. संपूर्ण कालावधीत मी आरक्षण घेईनच. फक्त तुमची एकजूट दिसू द्या. काट्यावर उभे राहायची वेळ आली तर रहा. मनोज जरांगे म्हणाले की, आपल्या मोर्चामुळे कुणाला त्रास होता कामा नये, 26 तारखेला मुंबईत आपली गर्दी वाढणार आहे. मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा समाज असणार आहे. महाराष्ट्र आणि मुंबई आपलीच आहे. मी समाजाचा शब्द मोडत नाही. कुठेही मार्ग निघो म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. आम्हाला आरक्षण मिळणार आहे, मिळाल्यावर गावाकडे जाऊ. आम्हाला तिकडे मुंबईत जाण्याची हौस नाही. पण मराठा समाजाला आरक्षण हवे. त्यामुळे लवकर तोडगा काढा. माझ्या समाजाच्या वतीने माझी विनंती आहे, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या तिघांनी चर्चा करावी, लगेच तोडगा काढावा. जुने नवे शिष्टमंडळ येते पण तोडगा निघत नाही. तिघापैकी एकाने येऊन तोडगा काढून जावे. दरम्यान, नवी मुंबईत तब्बल 10 लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. समाजबांधवांसाठी मराठा समाजातून घरोघरी 10 भाकरी किंवा 25 चपात्या, चटणी, ठेचा, लोणचे आदी पदार्थ जमा करण्यात आले होते. हे अन्न संकलित करण्याचे काम बुधवारपासून सुरू होते. मराठा आरक्षण समर्थक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून मुंबईच्या दिशेने जाणार होते, मात्र आज पोलिसांनी त्यांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जाण्याचे आदेश दिले. यामुळे आंदोलक नाराज झाले होते . मनोज जरांगे यांना नोटीस आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. आझाद मैदानाची क्षमता 5 हजार आहे. परंतु लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे आझाद मैदानाच्या क्षमतेची मनोज जरांगे यांना जाणीव करुन द्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून सुचवण्यात आले.
कुर्ल्याला भोजनाची व्यवस्था
मुंबईत आझाद मैदानावर उपोषण आणि आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. उद्या 26 जानेवारीला मनोज जरांगे पाटील मुंबईतआझाद मैदानावर येणारच आणि झेंडा फडकवणारच असे मराठा मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी ठामपणे ‘नवाकाळ’ला सांगितले. आंदोलनाची परवानगी नाकारली असली तरी आझाद मैदान इथे राईट टू प्रोटेक्शन यासाठी जागा आहे ती आम्ही ताब्यात घेतली आहे… तिथेच जरांगे पाटील येतील आणि आम्ही शांततेत आमचे आंदोलन करु असे वीरेंद्र पवार यांनी सांगितले. आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था कुर्ल्याला केली आहे, त्याच बरोबर या बांधवांना समर्थन देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी बरोबर भाजी भाकरी घेऊन यावी असे वीरेंद्र पवार यांनी आवाहन केले आहे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top