जरांगे-पाटलांचा निर्णयाचा गोंधळ लोकसभा की विधानसभा? ठरलेच नाही

अंतरवाली सराटी – लोकसभा निवडणुका जाहीर होऊन पहिल्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 मार्च असतानाही जरांगे-पाटील यांनी मराठा उमेदवार लोकसभेला उभा करायचा की, विधानसभेला उभा करायचा याचा निर्णय दिला नाही. त्यांचाच गोंधळ सुरू आहे किंवा लोकसभा निवडणूक लढवायची नाही, असे त्यांनी मनोमन ठरविल्याने काल त्यांनी अंतिम काहीच सांगितले नाही. त्यात प्रत्येक मतदारसंघात हजारो उमेदवार उभे करायचे ही त्यांची आधीची घोषणा म्हणजे नुसती वाफ होती हेही कालच्या सभेत स्पष्ट झाले.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी निर्णय घेऊन त्याची तयारी सुरू करणे आवश्यक असताना निवडणूक जाहीर झाल्यानंतर काल होळीच्या दिवशी जरांगे- पाटील यांनी गावात सभा बोलावली. या सभेला लाखो मराठे कार्यकर्ते हजर झाले.तळपत्या उन्हात मराठे सभा ऐकण्यास बसून होते. पण या सभेत जरांगे-पाटील यांनी निर्णयाचा गोंधळ घातला.
लोकसभा निवडणुकीवेळी प्रत्येक मतदारसंघात शेकड्याने उमेदवार उभे करून ईव्हीएम वापरताच येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करायची ही जरांगे-पाटील यांची यापूर्वीची घोषणा होती. कालच्या सभेत त्याचा उल्लेखही झाला नाही.
जरांगे-पाटील म्हणाले की, आचारसंहिता संपल्यावर आपला शासन निर्णय घेतात का ते पाहू आणि नाही घेतला तर विधानसभा लढवून त्यांना धडा शिकवू. आपला प्रश्न केंद्राकडे नसून राज्याकडे आहे तेव्हा लोकसभा निवडणूक न लढवता विधानसभा लढवूया. लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणे किचकट असते, आपले अर्ज बाद झाले किंवा आपला उमेदवार पडला तर वाईट होईल. (मात्र सभेला आलेल्या सर्वांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत लोकसभा लढविण्याचा आग्रह धरल्याने जरांगे पुढे काही बोलले नाहीत.) त्यानंतर जरांगे म्हणाले की, तुम्ही प्रत्येक नेत्याकडे जाऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का ते लिहून घ्या. ज्याचा पाठिंबा नसेल त्याला विरोध करू (पण मराठा आरक्षणाला सर्वच नेते. पाठिंबा देणार हे उघड असल्याने जरांगे याचा हा प्रस्तावही फेटाळण्यात आला) मग जरांगे-पाटील म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यातून आपण अपक्ष म्हणून एक उमेदवार
उभा करू.
याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र जरांगे-पाटील यांना लोकसभा नकोच असावी. त्यामुळे त्यांनी यावर अंतिम आदेश दिलाच नाही. त्यांनी जाहीर केले की, तुम्ही गावी जा, तिथे बैठक घ्या आणि गावातील प्रत्येकाचे मत तो ज्या शब्दांत सांगेल त्या शब्दांत नोंदवा. ती वही घेऊन गावातील एकाने यायचे आणि मला वही आणून द्यायची. इतरांनी यायचे नाही. या वह्या वाचून मी 30 मार्चला निर्णय देईन. त्यावेळी सभा होणार नाही, मी थेट निर्णय जाहीर करीन.
जरांगे-पाटील 30 मार्चला निर्णय जाहीर करणार याचा अर्थ पहिल्या टप्प्यात (27 मार्च उमेदवारी अर्जाची अंतिम तारीख) एकही मराठा उमेदवार गोंदिया आदि भागात उभा राहणार नाही. 30 मार्चला त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायचे जाहीर केले तरी उमेदवाराची निवड करणे, अपक्ष म्हणून त्याला आयोगाकडून चिन्ह मिळविण्याची प्रक्रिया आणि मग त्याचा प्रचार यासाठी अवधी कमी पडणार आहे. एकूणच कालची सभा ही नियोजनअभावी अनिर्णायक ठरली किंवा तशी ती घडवली गेली. दोन्ही बाजूंनी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top