जरांगे-पाटील यांची प्रकृती बिघडली भाषण करतानाच मंचावर बसले

धाराशीव – मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील हे गेले आठ दिवस दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात ते सतत जाहीर सभा घेत आहेत. आज मात्र माकणी येथे भाषण करीत असतानाच त्यांची प्रकृती इतकी बिघडली की, ते भाषण थांबवून पटकन मंचावर बसले. हे बघून मराठा आंदोलकांचा जीव कळवळला. डॉक्टरांनी त्यांना लगेच तपासले आणि त्यांना पाच दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.
मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाल्यापासून जरांगे-पाटील यांनी विश्रांती घेतलेली नाही. उपोषणानंतर रुग्णालयात काहीच दिवस उपचार घेऊन त्यांनी कोकण दौरा सुरू केला. त्यानंतर पुन्हा काही दिवस रुग्णालयात उपचार घेऊन त्यांचा दुसरा दौरा सुरू झाला. यावेळी ते रोज काही हजार किलोमीटर प्रवास करून दिवसाला तीन ते चार ठिकाणी भाषण घेत होते. त्याचा अखेर त्यांच्या प्रकृतीवर
परिणाम झालाच.
दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जरांगे-पाटील सभेच्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी कडक ऊन होते. जरांगे सभा घेतात, तेव्हा ऊन असूनही डोक्यावर काही घेत नाहीत. मराठा बांधव रणरणत्या उन्हात बसून भाषण ऐकताना आपण छताखाली सावलीत भाषण करणार नाही, अशी त्यांची भूमिका असते. आजही त्यांनी भर उन्हातच भाषणाला सुरुवात केली. परंतु भाषणाच्या मध्येच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांनी बसूनच भाषण पूर्ण केले. मात्र, बरे वाटत नसल्याने त्यांना ते थोडक्यात उरकावे लागले.
भाषण संपल्यावर डॉक्टरांनी मंचावरच त्यांची तपासणी केली. त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही त्यांच्या रक्तदाब आणि रक्तातील साखरेच्या पातळीची तपासणी केली. त्यांची साखरेची पातळी कमी आढळली. त्यांना अंगदुखी आणि थकव्याचा त्रास जाणवत आहे. तसेच सतत साखरेची पातळी कमी झाली, तर त्याचा किडनीवर परिणाम होतो. म्हणून आम्ही त्यांना चार-पाच दिवस आराम करण्याचा सल्ला
दिला आहे.
जरांगेंचा चौथ्या टप्प्यातील दौरा उद्या संपणार असून, ते अंतरवाली सरावटीला त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी परत जाणार आहेत. मात्र डॉक्टरांनी दिलेला विश्रांतीचा सल्ला ते ऐकतील का, याबद्दल शंका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. प्राणाची बाजी लावून मी आरक्षणाची लढाई लढत आहे. आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आली असून, आरक्षण मिळाल्याशिवाय मी गप्प राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
गोड बोलायचे आणि डाव टाकायचे!
फडणवीसांवर पुन्हा कठोर टीका

गोड बोलायचे आणि डाव टाकायचे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. पण मराठे आता पहिल्यासारखे राहिले नाहीत. ते कोणत्याही टोकाला जावू शकतात याचे भान ठेवून गांभीर्याने निर्णय घ्या. मंत्री छगन भुजबळांचे ऐकून निर्णय घेणार असाल तर परिणाम 100 टक्के भोगावे लागणार, असा गंभीर इशारा जरांगे-पाटील यांनी काल लातूर येथे झालेल्या सभेत दिला.
फडणवीसांना उद्देशून जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आले पाहिजे की, राज्यात शांतता राहिली पाहिजे. आपण सरकार चालवत आहात. फडणवीसांनी जो जो शब्द दिला त्याचा सन्मान मराठ्यांनी केला आहे. मराठा समाज शांत राहिला आहे. गुन्हे मागे घेतो असेही फडणवीस म्हणाले होते, तरी अटकसत्र सुरूच आहे. तुमच्या मनात डाव काय याचे स्पष्टीकरण फडणवीसांनी द्यावे. तुम्हाला थांबायचे नसेल तर आम्ही तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही मराठ्यांशी खेटू नका. ही धमकी आणि इशारा नाही. मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार दिले आहेत. त्याची परतफेड डाव टाकून मराठ्यांना संपवून करू नका. तुमचे 5 ते 7 लोक नेहमी मराठ्यांवर गरळ ओकत आहेत. तुम्हाला याचे गांभीर्य नसेल तर परिणाम 24 डिसेंबरनंतर दिसतील. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही आणि हे बुजगावणे थांबवले नाही तर यांना उठवायला आम्हाला वेळ लागणार नाही. या लोकांना आवरा, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या.
यावेळी जरांगेंनी छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकरांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, भुजबळ-पडळकर यांनी आता थांबावे, जातीय तेढ निर्माण करू नये. यामधून काही मिळणार नाही. माझी त्यांना शेवटची विनंती की, जीभेला आवर घाला. मराठा-ओबीसी बांधवांमधील संबंध खराब करू नका. राज्यात शांतता आणि सलोखा पाहिजे. गावखेड्यातील मराठा-ओबीसी एकमेकांच्या मदतीला धावतात. तुम्ही राजकीय स्वार्थासाठी गोरगरिबांमध्ये झुंज लावू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top