जळगावात पारा ४२ अंशावर पाणीटंचाईचे गडद संकट

जळगाव :

जिल्ह्याचा कमाल पारा ४२ अंशावर गेला असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट आले असून जिल्ह्यात ४२ गावात ५० टँकरने पाणी पुरवठा होत आहे. प्रशासन निवडणूक प्रक्रियेत अडकले असताना पाणीटंचाईकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

१९६५ साली बांधून पूर्ण झालेले उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे गिरणा धरण आतापर्यंत केवळ १२ वेळा पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. आज त्यात केवळ ३१ टक्के पाणीसाठा आहे. या धरणावर सात तालुके पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असून १० नगरपालिका, १३० पाणी पुरवठयाच्या योजना, १७४ गावे, मालेगाव, पाचोरा भडगाव नांदगाव एमआयडीसी पाण्यासाठी अवलंबून आहेत.

सध्या असलेला साठा जुलैपर्यंत पुरवण्याचे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे. यातून केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच पाणी सोडण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने जाहीर केले आहे. जिल्हयात १३ मध्यम प्रकल्प असून यापैकी मन्याड, भोकरबारी प्रकल्पात पाणी साठा संपलेला आहे तर अग्नावती ६ टक्के, हिवरा, अंजनी प्रत्येकी १४ टक्के, बोरी २४ टक्के, बहुळा ३४ टक्के अशी पाणीसाठ्याची स्थिती असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ९६ लघू प्रकल्पात केवळ १६ टक्के साठा शिल्लक आहे. अमळनेर, चाळीसगाव, पारोळा, भडगाव, वरणगाव, चोपडा, बोदवड, पालिकांकडून ६ ते ८ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. एप्रिल आणि मे हे दोन महिने वाढत्या तापमानाचे असून पाणीटंचाईची स्थिती आणखीच बिकट होणार आहे. त्यामुळे पाणी पुरवण्याचे आव्हान प्रशासनापुढे असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top