जहाजाच्या अपहरणाची शक्यता ब्रिटीश लष्कराने दिला इशारा

लंडन
होरमुझ च्या सामुद्रधुनीत एका मालवाहतूक जहाजावर काही जणांनी ताबा मिळवला असून या जहाजाचे अपहरण होण्याची शक्यता असल्याचा इशारा ब्रिटनच्या लष्कराने दिला आहे.
युनायटेड किंगडम च्या मेरिटाईम ट्रेड ऑपरेशनने हा इशारा दिला असून या बद्दल अधिक तपशील दिला नाही. फुजीराह शहराच्या जवळ असलेल्या ओमानच्या आखातात या जहाजावर काही जणांनी ताबा मिळवल्याची माहितीही त्यांनी दिली. इराण आणि पश्चिमेकडील देशांमध्ये सुरु असलेल्या सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना गंभीर समजली जात आहे. इस्रायलने सिरियामधील इराणच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर इराणच्या हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. अर्थात इराणने हे जहाज ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दूजोरा दिलेला नसला तरी २०१९ पासून इराणने अनेक जहाजांना जप्त केले असून काही जहाजांवर हल्ले केले आहेत. इराण व पश्चिमेकडील देशांमध्ये वाढत असलेला तणाव आता अणू कार्यक्रमाच्या दिशेनेही जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
ओमानच्या आखाताच्या जवळच होरमुझची सामुद्रधुनी असून पर्शियन आखाताच्या दिशेने जाणारा हा एक चिंचोळा मार्ग आहे. अनेक तेलवाहू जहाजे या मार्गाने जात असतात. फुजीयारा हे अरब अमिरातीच्या पूर्वेला वसलेले शहर असून तेल वाहतूकीचे ते एक महत्त्वाचे केंद्र आहे. या जहाजाचे अपहरण होण्याची घटना या भागातील तणाव अधिक वाढवणारी आहे. २०१९ सालापासून या भागात अनेक स्फोट झाल्याचे आढळून आले आहे. इराण ने अमेरिकन नौदलाच्या एका जहाजावर हल्ला केल्याचा आरोपही अमेरिकन नौदलाने केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top