जेईई ॲडवान्स्‍ड परीक्षेसाठी २७ एप्रिलपासून नोंदणी सुरू

मुंबई

इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांना जेईई ॲडवान्स्ड ही परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया शनिवार २७ एप्रिलपासून सुरू होणार आहे. २६ मे रोजी राष्ट्रीय पातळीवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. आयआयटी व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये पदवी स्‍तरावरील अभियांत्रिकी अभ्यासक्रम (बीटेक) करिता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश परीक्षेतील कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत.

या प्रक्रियेंतर्गत याआधी जेईई मेन्‍स परीक्षा जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांमध्ये नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सीतर्फे घेण्यात आली. जानेवारी सत्राच्‍या परीक्षेचा निकाल यापूर्वीच जाहीर झाला आहे. एप्रिल सत्रातील परीक्षा पार पडल्‍यावर अंतिम उत्तरतालिका (आन्‍सर की) संकेतस्‍थळावर जारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवेशप्रक्रियेतील पुढील टप्‍पा म्‍हणजे जेईई ॲडवान्स्‍डच्‍या नोंदणीची लगबग शनिवारपासून सुरू होणार आहे. परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २७ एप्रिल ते ७ मेपर्यंत आहे. परीक्षा शुल्‍क भरण्याची अंतिम तारीख १० मेपर्यंत आहे. ॲडमिट कार्ड १७ ते २६ मे दरम्‍यान उपलब्‍ध होण्याची शक्यता आहे. जेईई ॲडवान्स्‍ड परीक्षा २६ मे आणि आन्‍सर की व निकालाची घोषणा ९ जून रोजी होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top