‘जोडो, जोडो, भारत जोडो’चा जयघोष मणिपूर ते मुंबई! राहुल गांधी निघाले

इम्फाळ – लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तणावग्रस्त मणिपूरमधून आपली दुसरी यात्रा सुरू केली. पूर्व-पश्‍चिम जाणारी ही यात्रा 20 मार्चला मुंबईत जाहीर सभेने समाप्त होईल. आज सेवा दलाचे कार्यकर्ते आणि काँग्रेसींनी ‘जोडो, जोडो, भारत जोडो’चा जयघोष करीत द्वेष मिटविण्यासाठी निघालेल्या ‘मुहब्बत की दुकान’ बसला हिरवा झेंडा दाखविला.
भारत जोडो न्याय यात्रेसाठी एक खास बस तयार करण्यात आली आहे. या बसचे उद्घाटन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. या बसच्या मागे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि खरगे यांच्या प्रतिमा आहेत आणि त्यावर ‘मोहब्बत की दुकान’ असे लिहिले आहे. बसवर एक गिटारिस्ट गाणे वाजवत होता. ‘सहो मत-डरो मत’ या यात्रेच्या गाण्यासह त्याने काही गाणीही गायली. खरगे यांनी राहुल गांधींच्या हाती भारताचा तिरंगा सुपूर्द केला. हा तिरंगा यात्रेच्या 66 दिवसांच्या कालावधीत यात्रेसोबत फडकत राहणार आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव मणिपूरची राजधानी इम्फाळपासून 28 कि.मी. दूर थौबल येथील मैदानापासून या यात्रेची सुरुवात करण्यात आली. या मैदानाला ‘न्याय मैदान’ असे नाव देण्यात आले होते. यात्रेपूर्वी खोंगजोम युद्ध स्मारकाला भेट देऊन राहुल यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. आज पहाटेच्या धुक्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या उड्डाणाला उशीर झाला. नेत्यांनी विमानात बसल्यापासूनच ‘न्याय का हक, मिलने तक’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली होती.
राहुल गांधी भाषणात म्हणाले की, 29 जून रोजी मी मणिपूरला आलो होतो. त्या दौर्‍यात मी जे पाहिले आणि ऐकले ते आधी कधीही ऐकले नव्हते. 2004 पासून मी राजकारणात आहे. पहिल्यांदा मी भारताच्या एका प्रदेशात गेलो, जेथे प्रशासनाचा पूर्ण ढाचा कोसळला होता. ज्याला आम्ही मणिपूर म्हणायचो. 29 जूननंतर ते मणिपूर राहिलेच नाही. कानाकोपर्‍यात तिरस्कार पसरला आहे. भाऊ-बहीण, माता-पिता डोळ्यांसमोर गेले. आजपर्यंत भारताचे पंतप्रधान मणिपूरमध्ये तुमचे अश्रू पुसायला, तुमची गळाभेट घ्यायला आले नाहीत. हे लज्जास्पद आहे. कदाचित भाजपा आणि संघाच्या दृष्टीने मणिपूर हा भारताचा भागच नाही. तुमचे दु:ख त्यांचे नाही. मागील वर्षी आम्ही ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली. कन्याकुमारी ते काश्मीर आम्ही 4 हजार कि.मी. चाललो. भारताला जोडण्याविषयी आम्ही बोललो. आम्ही तिरस्कार मिटवण्याविषयी बोललो. एक धर्म, जात, दुसर्‍या जातीशी जोडण्याविषयी आम्ही बोललो. त्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी सांगितले की, आता पूर्वेकडून पश्‍चिमेकडेही चाला. मलाही वाटत होते की, आपण पूर्व-पश्‍चिम पायी यात्रा करू. पण निवडणुकांचा काळ आहे. पायी जायला खूप जास्त वेळ लागेल, म्हणून ही यात्रा हायब्रीड (संमिश्र) ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला. ही यात्रा बस आणि पायी अशी मिश्र असेल. प्रश्‍नहा होता की यात्रा सुरू कुठून करायची. मी स्पष्ट सांगितले की, पुढील भारत जोडो यात्रा केवळ मणिपूरपासूनच सुरू होऊ शकते. भाजपाचे, संघाचे जे तिरस्काराचे राजकारण आहे त्या विचारधारेचे मणिपूर एक प्रतिक आहे. तुम्ही जे येथे गमावले ते भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणामुळे गमावले. पण तुमच्यासाठी जे मौल्यवान आहे, जे तुम्ही गमावले ते आम्ही परत आणू.
तुमचे दु:ख आम्ही जाणतो. तुमचे जे नुकसान झाले, तुम्हाला ज्या परिस्थितीतून जावे लागले ते सर्व आम्ही जाणतो आणि ते आम्ही पुन्हा आणू. शांतता आणि एकात्मतेसाठी हे राज्य एकेकाळी ओळखले जात होते, ती शांतता आम्ही परत आणू.
राहुल पुढे म्हणाले की, न्याय यात्रा का? कारण भारतातला हा काळ सामाजिक, आर्थिक, राजकीय अन्यायाचा आहे. मणिपूरच्या लोकांवर, येथील परंपरेवर तर अन्याय झाला आहेच, पण देशावरही अन्याय झाला आहे. आर्थिकदृष्ट्या काही थोडक्या लोकांचे वर्चस्व प्रस्थापित केले जात आहे, मूठभर लोकांसाठी संपूर्ण देशाच्या संपत्तीची दारे खुली आहेत. एक-दोन लोकांकडेच संपत्ती एकवटली आहे. देश महागाईने होरपळत आहे. सामाजिकदृष्ट्या तळागाळातल्या, दलित, आदिवासी लोकांचा राजकारण आणि प्रशासकीय प्रक्रियेत काही सहभाग नाही. हिंदुस्थानचा मोठा वर्ग राजकीय, शासकीय प्रक्रियेच्या बाहेर आहे. या सगळ्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा आहे. भारत जोडो यात्रेत सात-आठ तास चालत मी तुमचे म्हणणे ऐकून घेत होतो. या यात्रेचेही तेच लक्ष्य आहे. आम्हाला ‘मन की बात’करायची नाही. आम्हाला तुमचे म्हणणे ऐकायचे आहे. तुमचे दु:ख जाणून घेऊ इच्छितो. तुमच्यासह भारताचे पुढील स्वप्न हे एकात्मतेचे, समतेचे,
बंधुभावाचे असेल.
ईशान्येकडील राज्यांना डोळ्यासमोर ठेवून थौबल येथून हा प्रवास सुरू करण्यात आला आहे. मणिपूरमधील हिंसाचारामुळे लोकांचा भाजपबद्दल भ्रमनिरास झाला असल्याचे रणनीतीकारांचे मत आहे. यामुळेच ईशान्येच्या 25 जागांसाठी राहुल गांधी 13 दिवस इथे राहणार आहेत. यात्रा एक दिवस मणिपूरमध्ये राहणार आहे. त्यानंतर उद्या ती नागालँडमध्ये कोहिमा येथे प्रवेश करील आणि दोन दिवसात 257 किमी आणि 5 जिल्हे आणि आठ दिवसांत 833 किमी आणि आसाममधील 17 जिल्हे व्यापेल. यानंतर ही यात्रा अरुणाचल प्रदेश आणि मेघालयमध्ये प्रत्येकी एक दिवसासाठी जाईल. त्यानंतर पश्‍चिम बंगाल, बिहार, झारखंड असा यात्रेचा प्रवास पूर्वेकडून पश्‍चिमेकडील राज्यांमध्ये होईल आणि यात्रेचा शेवट मुंबईत होणार आहे.
खरगे म्हणाले की, पंडित नेहरू पहिल्यांदा मणिपूरला आले तेव्हा त्यांनी मणिपूरला भारताचे भूषण म्हटले होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीही हेच सांगितले होते. ही मणिपूरची भूमी आहे. मणिपूरने स्वातंत्र्यासाठी लढा दिला. यात्रेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात अधीर रंजन चौधरी, दिग्विजय सिंह, रणदीप सुरजेवाला, पवन खेरा आदी नेत्यांची उपस्थिती होती.

अशी असेल यात्रा
भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी ते 20 मार्च प्रवास करेल. या यात्रेत 15 राज्ये आणि 110 जिल्ह्यांतील 337 विधानसभा जागांचा समावेश असेल. या काळात राहुल गांधी बसने आणि पायी 6 हजार 713 किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत. यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन नागालँड, आसाम, मेघालय, पश्‍चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून जाईल आणि महाराष्ट्रात संपेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top