तामिळनाडूत राहुल गांधी उतरताच हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकार्‍यांकडून अचानक तपासणी

तिरुवनंतपूरम – तामिळनाडूतील निलगिरीमध्ये आज सोमवारी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरने दाखल झाले. ते हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील अधिकार्‍यांनी अचानक तिथे येऊन त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून, एखाद्या पक्षाच्या इतक्या मोठ्या नेत्याचे हेलिकॉप्टर संशयावरून तपासण्याची ही पहिलीच वेळ असावी.
आज सकाळी राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर निलगिरी येथे पोहोचले. राहुल गांधी त्यातून बाहेर पडताच निवडणूक भरारी पथकाच्या अधिकार्‍यांनी हेलिकॉप्टरची तपासणी केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या हेलिकॉप्टर तपासणीबाबतचा तपशील आज उशिरापर्यंत समोर आला नव्हता. या तपासणीनंतर राहुल गांधी यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार निलगिरी महाविद्यालयात कला आणि विज्ञानाचे विद्यार्थी आणि चहाच्या बागेतील कामगारांची भेट घेतली.
तामिळनाडूनंतर राहुल गांधी हे केरळच्या त्यांच्या मतदारसंघात वायनाडला पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी रोड शो केला. यावेळी त्यांनी तेथील लोकांचे आभार मानले. ते म्हणाले की, वायनाडमधील प्रत्येक व्यक्‍ती माझे कुटुंब आहे. भाजपा आणि पंतप्रधान हे ‘एक भाषा, एक देश, एक नेता’ असा नारा देतात. पण त्यांना आपला देश अजिबात कळलेला नाही. भाषा ही अशी गोष्ट आहे की, जी प्रत्येकाच्या हृदयातून येते. ती तुम्हाला तुमच्या सभ्यतेशी जोडते. इतिहास, संस्कृती आणि धर्माचीही तीच स्थिती असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. वायनाडच्या जाहीर सभेनंतर राहुल गांधी उत्तर कोझिकोडमध्ये पोहोचले. ते उद्या मंगळवारी पुन्हा वायनाडला जाणार आहेत. त्यानंतर 18 एप्रिल रोजी ते कन्नूर, तिरुवनंतपूरम अणि आलाप्पुळा जिल्ह्यात जाहीर प्रचार सभांना संबोधित करतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top