दादा म्हणजे अजित पवारच! बोरवणकर बरसल्या 2-जी घोटाळ्यातील बलवासाठी दादांची दडपशाही

मुंबई – प्रसिध्द माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात ज्या दादांवर आरोप केला होता ते अजित पवारच आहेत, असे पत्रकार परिषद घेऊन सांगत बोरवणकर दादांवर बरसल्या! पोलिसांसाठी राखीव जागा 2-जी घोटाळ्यातील आरोपी बिल्डर याच्या पुन्हा घशात घालण्यासाठी अजित पवार दडपशाही करीत होते, पण मी मानले नाही असे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर दिवंगत तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील हेही अजित पवारांच्या विरोधात होते असेही त्या म्हणाल्या. मात्र मीरा बोरवणकर आताच इतके सनसनाटी आरोप का करीत आहेत? अजित पवार यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्याचे हे षड्यंत्र आहे का, हा मोठा प्रश्‍न आहे.
मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात खळबळजनक दावे केले आहेत. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. आज बोरवणकर यांनी अजित पवारांचे थेट नाव घेतले. त्या म्हणाल्या की, माझे पुस्तक न वाचताच कालपासून बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहे. पुस्तकात 38 प्रकरणे आहेत. त्यात वेगवेगळे अनेक विषय आहेत. त्यातील 21वे प्रकरण हे येरवडा तुरुंगाच्या जागेसंदर्भात आहे. परंतु ते एक प्रकरण घेऊन सनसनाटी माजवली जात आहे. जे घडले ते सगळे मी या प्रकरणात दिले आहे.
मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांचे नाव घेऊन सांगितले की, या जागेचा लिलाव अजित पवार यांनी केला नव्हता, हे खरे होते. तो लिलाव विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील कमिटीने घेतला होता. मात्र त्यानंतर मला अजित पवार यांनी ही जागा खासगी बिल्डरला हस्तांतरित करायला सांगितली. हा बिल्डर म्हणजे शाहिद बलवा होता. ही जागा आपल्या दोन जागांच्या मधोमध असल्याने ती आपल्याला मिळावी, अशी त्याने मागणी केली होती. यासाठी त्याने कोर्टाचेही दरवाजे ठोठावले होते.
अजित पवारांचे असे म्हणणे होते की, लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे ही जागा हस्तांतरित करायला काय हरकत आहे? परंतु मी त्याला नकार दिला. कारण माझा असा प्रश्‍न होता की, लिलावाची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असेल, तर माझ्या आधीच्या अधिकार्‍यांनी ती हस्तांतरित का केली नाही? तसेच मला असे वाटत होते की, ही लिलाव प्रक्रिया योग्य पद्धतीने झालेली नाही. ती जागा अतिशय मोक्याची आहे. तिथे पोलिसांची कार्यालये, घरे होऊ शकतात. अशी जागा पोलिसांना पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे मी विरोध केला. नंतर गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याकडेही मी हा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांनी तुम्ही या प्रकरणात पडू नका, असे मला सांगितले होते. परंतु नंतर त्यांना माझे म्हणणे पटले. त्यांनी या संदर्भातील निर्णय बदलला. त्यामुळे या जागेचे हस्तांतरण झाले नाही. ही जागा आजतागायत हस्तांतरित झालेली नाही. ती हस्तांतरित झाली नसल्याने नंतर मीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही. ती बिल्डरला दिली असती, तर या प्रकरणाचा पाठपुरावा केला असता.
मीरा बोरवणकर म्हणाल्या की, बलवा बिल्डर नंतर टू-जी घोटाळा प्रकरणात तुरुंगात गेला. त्याचाही फायदा आम्हाला झाला. कारण तुरुंगात गेलेल्या बिल्डरला जमीन देणे सरकारसाठी लाजिरवाणे ठरले असते. या संदर्भातील बातम्या आल्यापासून आपल्याला अनेकांचे फोन आणि मेसेज येत असल्याचे आणि त्यात काही सरकारी अधिकारीही असल्याचे बोरवणकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, अनेक ठिकाणी जागा वाचविण्यासाठी या प्रकारे प्रयत्न चालू आहेत. लोकांनी आपले अनुभव मला सांगितले. सरकारी जागेवर बिल्डरांची नेहमीच नजर असते. ती वाचवणे आणि लोकहितासाठी वापरणे ही आपली जबाबदारी असते. जिथे जिथे या सरकारी जागा बिल्डरांना देण्यात आल्यात तिथे तिथे रिव्ह्यू करायला हवा, असे माझे म्हणणे आहे.
दरम्यान, हे प्रकरण घडले, त्यावेळी विभागीय आयुक्त असलेल्या दिलीप बंड यांनी अजित पवार यांना आज क्लीनचिट दिली. ते म्हणाले की, मी माजी विभागीय आयुक्त असताना येरवडा येथील जमिनीचा प्रस्ताव शासनाला दिला होता. एका बिल्डरकडून हा प्रस्ताव आला होता. त्यांच्याकडे आधीच येरवडा पोलीस स्टेशनच्या आसपासची जमीन होती. त्या जमिनीमध्ये पोलीस विभागाची जमीन येत होती. त्यामुळे त्याला ती जमीन हवी होती. ही जमीन पोलीस विभागाची असल्यामुळे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी याला मान्यता दिली होती. तेव्हा मीरा बोरवणकर आयुक्त म्हणून रुजू झाल्या होत्या. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी ही बैठक घेतली असली तरी त्या जागेचा आणि अजित पवार यांचा काही संबंध नाही. मात्र मीरा बोरवणकर यांनी उगाच लोकांची दिशाभूल करू नका, असे उत्तर बंड यांना दिले.
दरम्यान, बोरवणकर यांनी इतक्या वर्षानंतर हे आरोप का केले, असा प्रश्‍न विचारला जात आहे. या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले की, बोरवणकरांनी आपल्या पुस्तकाचा खप वाढविण्यासाठीच अजित पवारांवरती हे आरोप केले आहेत. कुठल्याही प्रकारे या प्रकरणाचा तत्कालीन पालकमंत्र्यांशी संबंध येत नाही.
अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनीही म्हटले की, बोरवणकरांना अचानक आत्मचरित्र लिहावे, असा साक्षात्कार होणे, आपले नावही कुणाला माहिती नाही व पुस्तकही कुणी वाचायला घेणार नाही म्हणून केवळ प्रसिद्धीसाठी सोयीचे बिनबुडाचे आरोप केले आहेत. मीराबाई, तुमचा बोलविता धनी कोण, तो शोधावाच लागेल. तर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी तर बोरवणकर यांना थेट इशाराच दिला की, पुस्तक प्रकाशन करताना त्याची चर्चा व्हावी, आपण प्रसिद्धीझोतात यावे यासाठी मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर खोटे आरोप केले आहेत. मीरा बोरवणकर यांनी यासंदर्भात पुरावे द्यावे, अन्यथा त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल.
माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर राज्य आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी. अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top