देवगिरी किल्ला संवर्धनाचे कामनिधी अभावी बंद! पर्यटक नाराज

छत्रपती संभाजीनगर :

तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून देवगिरी करणार असल्याचे जाहीर केले. मात्र सत्ताबदलानंतर त्यांचे खाते बदलले, नवीन मंत्री आले. मात्र किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाला गती मिळाली नाही, उलट सध्या निधीअभावी हे काम ठप्प झाले आहे. दिवाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर या किल्ल्याच्या पर्यटनासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून पर्यटक येत असताना येथील परिस्थिती मात्र आता विदारक झाली आहे.

या किल्ल्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू देवगिरीच्या वैभवाच्या व समृद्ध इतिहासाच्या साक्षीदार आहेत. यादव, बहामनी, तुघलक, निजाम अशा अनेक राजवटींचा इतिहास सांगणारा हा किल्ला सध्या वाईट अवस्थेत उभा आहे. किल्ल्यातील सोनेरी महाल, चिनी महाल, बारादरी, कचेरी, चार मिनार, शाही हमाम, रॉयल पॅलेस या ऐतिहासिक वास्तूंचा काळ, वास्तुकलेचा नमुना, इतिहास हे जाणून घेण्यासाठी ना इथे पाटी आहे ना त्यांचे जतन सुरू आहे. ते झाल्यास पर्यटक व इतिहासप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरेल.

अजिंठा, वेरूळ या आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली लेणी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक छत्रपती संभाजीनगरात येतात. मात्र या किल्ल्यातील ७ लेणी अजूनही अंधारात आहेत. इतिहासकारांच्या मते साधारण इसवी सन ९ व्या ते १० व्या शतकातील या लेणी असून त्यावरील कोरलेल्या शिल्पांवरून त्या जैन लेणी असाव्यात, असा अंदाज आहे. पुरातत्त्व विभागाने त्यांचे थोडे संवर्धन केले. मात्र, निधीअभावी नंतरचे काम ठप्प झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top