धारावीकरांना मिळणार ३५० चौरस फुटाचे घर !अदानी समूहाची घोषणा

मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणार्‍या धारावीचा पुनर्विकास होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.पात्र झोपडीधारकांना पाचशे चौरस फुटाचे घर मिळावे ,अशी मागणी धारावीकरांकडून केली जात आहे. काल धारावी प्रकल्पावर काम करणाऱ्या अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) या विशेष हेतू कंपनीने पात्र झोपडीधारकांना साडेतीनशे चौरस फूट घर देण्याची घोषणा केली.

धारावीतील या घराचे क्षेत्रफळ हे मुंबईतील अन्य झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या तुलनेत १७ टक्के अधिक असून धारावीकरांसाठी उभारल्या जाणाऱ्या इमारतीतील प्रत्येक फ्लॅटमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर आणि स्वतंत्र शौचालयासोबत स्वच्छता आणि सर्व मूलभूत सुखसोयी असणार आहे. हे फ्लॅट चांगले हवेशीर आणि आरोग्यदायी असतील. या नवीन धारावीमध्ये नागरिकांसाठी उत्तम व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैली उपलब्ध असणार आहे.
धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी समूहाला देण्यात आल्याने ठाकरे गटाच्यावतीने विशाल मोर्चा काढण्यात आला होता. तसेच यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. धारावीत १३ हजारहून अधिक छोटेमोठे विविध प्रकारचे उद्योग आहेत. अदानी समुहाने येथील झोपड्याचे पात्र अपात्र निकष १ जानेवारी २००० पर्यंतचे केले आहेत. याला येथील लोकांचा विरोध असून धारावीतील झोपडपट्टय़ांचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी धारावीकरांची आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top