नवनीत राणांना भाजपची उमेदवारी जाहीर! बच्चू कडूंचा विरोध कायम ! प्रचारास नकार

अमरावती- महायुतीतून प्रचंड विरोध असतानाही आज अमरावती लोकसभा मतदारसंघामधून भाजपने खासदार नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली. त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून कमळ निशाणीवर निवडणूक लढतील. दरम्यान नवनीत राणा यांना जरी उमेदवारी जाहीर झालेली असली तरी बच्चू कडू यांचा विरोध कायम आहे. आम्ही नवनीत राणा यांचे काम करणार नाही. आता आमची नाराजी काय आहे हे दाखवून देऊ, असा इशाराही कडू यांनी दिला. त्याचबरोबर आनंदराव अडसूळ यांचाही विरोध कायम असल्याचे समजते.

नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्राचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर १ एप्रिल रोजी निकाल आहे. असे असताना भाजपने आज त्यांना आपल्या पक्षाची उमेदवारी जाहीर केली.जर बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात त्या दोषी आढळल्या, व न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली, तर भाजपा काय करणार? असा सवाल केला जात आहे. नवनीत राणा यांना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ व प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा विरोध आहे. मात्र मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी अडसूळ पिता पुत्र व बच्चू कडू यांना वर्षावर बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर अडसूळ व कडू यांचा विरोध मोडून काढत भाजपने आज नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळणार हे फडणवीस व बावनकुळे यांच्या अमरावती दौऱ्यातच निश्चित झाले होते. त्यावेळी फडणवीस म्हणाले होते की, नवनीत राणा या आमच्या विचारांच्या आहेत. गेली ५ वर्ष त्यांनी संसदेत भाजपची बाजू लावून धरली. भाजपा आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे त्या आमच्या सोबतच राहतील असेही ते म्हणाले होते. त्यामुळे नवनीत राणा भाजपची उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. त्यानुसार आज त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top