नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडूंची बूब यांना उमेदवारी

अमरावती
अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार संघटनेच्या वतीने दिनेश बूब यांची उमेदवारी जाहीर केली. दिनेश बूब यांनी आज उबाठा गटाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.

प्रहार संघटनेत प्रवेश केल्यावर दिनेश बूब म्हणाले की, आज आयुष्यातील मोठा निर्णय घेत असून गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य केले आहे. आमच्या चार पिढ्या या सामाजिक कार्यात आहे. हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र हा मतदारसंघ काँग्रेसला गेला. अनेकांच्या आग्रहाखातर मी ही उमेदवारी घोषित करत आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाच्या नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून बच्चू कडू नाराज होते. आपली भूमिका जाहीर करत त्यांनी म्हटले होते की,णांनी आमच्याबद्दल खालच्या भाषेत टीका केलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे काम करणार नाही, एकवेळ राजकारणातून बाहेर पडू पण राणांचे काम करणार नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्यासाठी ही लढाई सुरु असून लोकशाहीचे पतन करणारा उमेदवार नको, अशी आमची भूमिका आहे.

दिनेश बुब हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि सध्याचे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख आहेत. राणा यांच्या विरोधात एक उमेदवार दिला तर त्यांना ताकद मिळेल, अन्यथा त्यांची लोकसभा निवडणूक लढविण्याइतकी ताकद नाही. नवनीत राणा यांच्या जातपडताळणी बाबतचा निर्णय १ एप्रिलला लागला आणि तो त्यांच्या विरोधात गेला तर त्यांची उमेदवारी रद्द करून ज्येष्ठ नेते रा.सु. गवई यांची कन्या किर्ती गवई अर्जुन यांना उमेदवारी देण्याची भाजपाने तयारी केली असल्याची चर्चा आहे. किर्ती गवई या तूर्त राजकारणात नाहीत. मात्र त्यांचे कार्य चांगले असल्याने त्यांना उमेदवारी देण्याबाबत बोलणी सुरू आहेत.

दरम्यान अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पोस्टरवर इतर नेत्यांबरोबरच राज ठाकरे यांचाही फोटो झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे यांनी अद्याप महायुतीत सामील होत असल्याची अधिकृत घोषणा केलेली नसल्याने त्यांचा फोटो भाजपा उमेदवाराने वापरल्याबद्ल ही चर्चा सुरु झाली आहे. उलट प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे महायुतीत असूनही त्यांचा आहेत मात्र त्यांचा फोटो या पोस्टरवर नव्हता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top