नांदेडमध्ये मोदी-शहांच्या सभांचा धडाका! नेत्यांची दमछाक, राजकीय वर्तुळात चर्चा

नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सभांचा धडाका लावला आहे. उद्या २० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. मोदी-शहांच्या सभांचे व्यवस्थापन करताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची चांगलीच दमछाक होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पराभव केला होता. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने दीड लाखांहून अधिक मते मिळवली होती. पण आता अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे नांदेड लोकसभेची जागा सलग दुसऱ्यांदा भाजपच्या खिशात जाईल असा दावा केला जात आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून मोदी आणि शहा यांच्या सभा येथे आयोजित करण्यात येत आहेत. एकाच मतदार संघात मोदी आणि शहा यांच्या सभा होत नाहीत. त्याला नांदेड अपवाद ठरला आहे. मात्र भाजपासाठी विजय मिळविणे सोपे नाही. म्हणूनच मोदी आणि शहा आपली ताकद लावत आहेत. त्यामध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांची दमछाक होत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे २०१४ च्या मोदी लाटेतही अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा नांदेडचा गड राखला होता. पण २०१९ मध्ये भाजपच्या चिखलीकरांनी त्यांचा पराभव केला. आता चव्हाण स्वतः भाजपामध्ये असून, प्रतापराव चिखलीकर पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. पण भाजपाची प्रचाराची रणनीती पाहता भाजपला येथून विजयाची खात्री वाटत नाही अशी चर्चा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top