नाशिकची सिटी लिंक बससेवा सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत

नाशिक – दोन महिन्याचे वेतन थकल्याने काल सिटी लिंक बस चालक, वाहन यांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले. पहाटे तपोवन येथील वाहनतळातून एकही बस बाहेर पडली नाही. संपावर सायंकाळ सहापर्यंत काही तोडगा न निघाल्याने प्रवासी, विद्यार्थी यांना दिवसभर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आजही संपामुळे सलग दुसऱ्या दिवशी बससेवा विस्कळीत होती. या संपात सुमारे १०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.
सेवा सुरु झाल्यापासून आतापर्यंत कर्मचाऱ्यांकडून वेतनासाठी हा नववा संप करण्यात आला आहे. वेतन होत नसल्याने काही दिवसांपूर्वी सिटी लिंक बसच्या चालक आणि वाहन यांनी संप पुकारला होता. त्यावेळी त्यांना आश्‍वासन मिळाल्याने संप स्थगित करण्यात आला होता. मात्र पुन्हा दोन महिन्याचे वेतन न मिळाल्याने शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारत एकाही बस पहाटे वाहनतळातून बाहेर काढली नाही.
मासिक वेतन वेळेवर करण्यात यावे, दोन महिन्याचे रखडलेले वेतन तत्काळ अदा करावे, पीएफ, ईएसआय वाहक यांच्या नावाने भरला जावा. यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी हे कामबंद आंदोलन करण्यात आले. तसेच या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर हे कर्मचारी ठाम आहेत. सिटीलिंक प्रशासन व ठेकेदार संगनमताने कर्मचारी वर्गाची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही यावेळी कर्मचाऱ्यांनी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top