निवडणुकीआधी खेळ केला! इम्रान खानना 10 वर्षांची शिक्षा

इस्लामाबाद- पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक आठवडाभरावर आली असताना माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सायफर प्रकरणात विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा ठोठावली आहे. त्यांच्यासोबत पीटीआयचे उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महुम्मद कुरेशी यांनादेखील 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. इम्रान खान यांना हा मोठा धक्का मानला जात असून या शिक्षेमुळे त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इम्रान खान आणि कुरेशी सध्या रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात आहेत. पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच इम्रान खान यांना शिक्षा ठोठावण्यात आली आल्याने पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. इम्रान खान यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. त्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले होते. या न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात इम्रान खान उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.
एप्रिल 2022 मध्ये सरकार पडल्यानंतर इम्रान खान यांनी सतत दावा केला की, अमेरिका आणि तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी त्यांचे सरकार पाडण्याचा कट रचला होता. त्यांना या कटाची माहिती अमेरिकेतील पाकिस्तानचे तत्कालीन राजदूत असद मजीद खान यांनी एका गुप्त पत्राद्वारे दिली होती, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. राजनैतिक भाषेत या पत्राला सायफर म्हणतात. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हणजेच परराष्ट्र मंत्रालयाने हे पत्रक पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला पाठवले होते. गेल्या वर्षी अनेक निवडणूक सभेमध्ये इम्रान यांनी हे पत्रक जनतेला दाखवत आपले सरकार पाडून आपली हत्या करण्यासाठी अमेरिकेच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. कायदेशीरदृष्ट्या हे पत्र नॅशनल सीक्रेट होते, जे सार्वजनिक ठिकाणी दाखवले जाऊ शकत नव्हते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत विशेष न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.
एप्रिल 2022 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणून इम्रान यांनी पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर 150 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांना 5 ऑगस्ट 2023 रोजी 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल देताना इस्लामाबादच्या न्यायालयाने इम्रान यांच्यावर 5 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे. यानंतर लाहोर पोलिसांनी त्यांना अटक केली.
पीटीआय पक्षाने एक्सवर पोस्ट करून या निकालाचा निषेध केला आहे. त्याने म्हटले आहे की, ही लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही पूर्णपणे इम्रान खान आणि कुरेशी यांच्या पाठीशी उभे आहोत. गेल्या वर्षी मार्चमध्ये घडले ते कुठलाही खटला बदलू शकत नाही. कप्तान आणि उपकप्तान नक्की तुरुंगाबाहेर येतील.
पाकिस्तानच्या मीडियाने दावा केला आहे की, इम्रान खान यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफवर बंदी आणली जाऊ शकते. निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना इम्रान यांना ही शिक्षा ठोठावण्यात आल्याने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पक्षाची ताकद वाढणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top