निवडणुकीच्या काळात पुन्हा काँग्रेसला आयकर नोटीस

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 2017 सालची आयकर थकबाकी पुढे करून आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला नोटीस बजावत त्यांची खाती सील केली. ही खाती सुरू करण्यासाठी काँग्रेसने न्यायालयात धाव घेतलेली असतानाच आयकरने त्यांच्या खात्यातून 135 कोटी काढून घेतले. यानंतर आता आयकरने पुन्हा एकदा त्याच थकबाकीच्या वसुलीसाठी काँग्रेसला 1,823 कोटींची दुसरी नोटीस बजावली आहे.
आता पाठवलेली नोटीस 2017 – 18 ते 2020-21 या वर्षासाठीच्या करापोटी पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये कर, दंड आणि व्याजाचा समावेश आहे. या नोटिशीनंतर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी असा आरोप केला आहे की, भाजपाकडून कर दहशतवाद केला जात आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी भाजपावर कर कायद्यांचे गंभीर उल्लंघन केल्याचा आरोप करत म्हणाले की, आम्हाला जो नियम लावला जातोय, तोच भाजपाला लावला तर त्यांना 4,600 कोटींची नोटीस प्राप्तिकर विभागाने द्यायला हवी.
आयकर प्रकरणात कालच दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसला दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही नोटीस पाठवण्यात आल्याने हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले जाते. आयकर विभागाविरुद्ध काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. काँग्रेसचे वकील आणि राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान आयकर विभागाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. आयकर विभागाची कारवाई अनावश्यक आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते. लोकसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्षाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आयकर विभागाची कारवाई करून सरकार निवडणुकीपूर्वी त्यांची खाती जप्त करत असल्याचेही काँग्रेसने म्हटले होते. यावर आयकर विभागाचे म्हणणे आहे की, ते केवळ त्यांची वसुली करत आहेत आणि कोणतीही खाती गोठवलेली नाहीत.
काँग्रेसच्या आयकर दस्तऐवजात यावर्षी 14 लाख रुपयांच्या रोख देणग्या मिळाल्याचे आढळले आहे. हे नियमांच्या विरोधी आहे. कोणताही पक्ष 2000 पेक्षा जास्त देणग्या रोख स्वरूपात स्वीकारू शकत नाही, असा नियम असून काँग्रेसने या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना करसवलत मिळाली नाही, असे आयकर विभागाचे म्हणणे आहे.

तृणमूल, कम्युनिस्ट पक्षालाही
आयकर खात्याची नोटीस

काँग्रेस पाठोपाठ आयकर विभागाने भारतीय कम्युनिस्ट पार्टीलाही 11 कोटी रुपये भरण्याची नोटीस पाठवली आहे. मागील काही वर्षांत आयकर परतावा भरताना जुने पॅनकार्ड वापरल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे. दंड आणि व्याज मिळून 11 कोटी रुपये भरायला सांगण्यात आले आहे. या बाबतीत आम्ही वकिलांबरोबर चर्चा करत असून, या संदर्भात कायदेशीर मदत घेतली जाणार आहे. तृणमूल काँग्रेसलाही गेल्या 72 तासांत 11 नोटीस बजावण्यात आल्याची माहिती टीएमसी नेते साकेत गोखले यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top