निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात २६४ पथके

पुणे

आगामी लोकसभा निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात १३५ भरारी पथके (एफएसटी) आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) स्थापन करण्यात आली आहे. ही पथके लोकसभा निवडणुकीत उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावरदेखील लक्ष ठेवणार आहेत. खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिकारात जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर खर्चावर नजर ठेवण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत २१ विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण १३५ एफएसटी पथक आणि १२९ एसएसटी पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३ व्हिडीओ सर्वेक्षण पथक आणि २ व्हिडीओ पाहणी पथक नेमण्यात आली आहेत. भोर मतदारसंघात १५ आणि इतर २० मतदार संघात प्रत्येकी ६ एफएसटी स्थापन करण्यात आली आहेत. मतदारांना राजकीय पक्षांकडून दिली जाणारी रक्कम आणि मद्य हे प्रकार रोखने, प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, सिव्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही इत्यादी कामे पथकांद्वारे केली जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top