न्यूड फोटो आपोआप होणार ब्लरइन्स्टाग्रामचे नवे फीचर

न्यूयॉर्क
इन्स्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेज (डीएम) संदर्भात युजर्सच्या सुरक्षिततेसाठी एका नवीन फीचरवर सध्या इन्स्टाचे काम चालू आहे. यामुळे मेसेजमध्ये न्यूड (नग्न) कंटेंट असल्यास तो आपोआप ब्लर (धुसर) होईल. लैंगिक घोटाळ्यांचे वाढते प्रमाण, आणि त्यासाठी केला जाणारा न्यूड कंटेंटचा गैरवापर टाळण्यासाठी हे फीचर आणण्यात येणार असल्याचे ‌‘मेटा‌’ने स्पष्ट केले.
या संदर्भात ‌‘मेटा‌’ने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीने न्यूड कंटेंट असलेला फोटो पाठवल्यास, समोरच्या व्यक्तीला तो फोटो ओपन करण्यापूर्वी ‌‘ब्लर वॉर्निंग‌’ स्क्रीन येईल. यानंतर तो फोटो पहायचा की नाही यासाठी पर्याय देण्यात येईल. नंतर या फोटोंचा गैरवापर केला जाऊ शकतो अशा ऑनलाइन चॅटिंगबाबत सेफ्टी टिप्स सांगणाऱ्या पेजवर हे मेसेज पाठवणाऱ्या व रिसीव्ह करणाऱ्या दोघांनाही रिडायरेक्ट केले जाईल. एखाद्या मेसेजला कोणी रिपोर्ट करेपर्यंत ‌‘मेटा‌’ला या फोटोंचा ॲक्सेस नसेल असेही स्पष्ट करण्यात आले.
सायबर क्राइम्सचे वाढते प्रमाण, आणि त्यातही लैंगिक घोटाळ्यांची लक्षणीय टक्केवारी हा जगभरातील सुरक्षा यंत्रणांचा डोकेदुखीचा विषय बनला आहे. अपलोड केलेले न्यूड्स एआयचा वापर करून एडिट करणे, आणि संबंधितांना ब्लॅकमेल करण्याचे प्रमाण भीतीदायक आहे. सहाजिकच फेसबुक व इन्स्टाग्रामवर तरुण मुले सुरक्षित नसल्याचे बोलले जाते. म्हणूनच मेटा ही पावले उचलत असल्याचे मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top