न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांच्या प्रचाराचा महायुतीचा आरोप

कोल्हापूर- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर न्यू कॉलेजमधून छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार होत असल्याची माहिती कळल्याने महायुतीतील भाजपा व शिवसेनेचे नेते आज थेट कॉलेज व्यवस्थापनाला जाब विचारण्यास कॉलेजमध्ये थडकले.
कॉलेजमधील शिक्षक तसेच तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट फॉर्म्समध्ये नातेवाईक, परिचितांची नावे व दूरध्वनी क्रमांक भरून आणण्याची सक्ती केली जाते. या माहितीचा वापर निवडणुकीसाठी केला जाणार आहे, फॉर्म्सच्या निमित्ताने छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार करण्यास भाग पाडला जात असल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला. एका शिक्षकाने भरलेले 20 फॉर्म आपण प्राचार्यांना दाखवल्याचा आरोप करत त्यांनी सगळे फॉर्म जाळून टाकण्यासाठी मागवून आपल्याला द्यावेत, या प्रकाराची तक्रार कॉलेज व्यवस्थापनातील इतर वरिष्ठ, पोलिस, कलेक्टर, शिक्षण खाते तसेच निवडणूक आयोगाकडे करावी अशी मागणी कॉलेज व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडे केली. जोपर्यंत ते अर्ज मिळत नाहीत तोपर्यंत जागेवरून हलणार नाही असा निर्धार करून त्यांनी तिथे धरणे आंदोलन केले. छत्रपती शाहू महाराज कॉलेजचे देणगीदार आहेत असे उत्तर प्राचार्यांनी दिले असता, कोणी एकच नव्हे तर सगळे कोल्हापूरच देणगीदार असल्यामुळे कोणत्याही एका उमेदवाराचा वैयक्तिक प्रचार नको, असे महायुतीच्या संतप्त नेत्यांनी बजावले. संस्थेतील कोणताही शिक्षक किंवा इतर कुणीही कुठल्याही राजकारणात पडणार नाही, अथवा तसा प्रयत्नही करणार नाही, अशी ग्वाही संस्थेच्या अध्यक्षांनी महायुतीच्या नेत्यांना दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top