पाकिस्तान एअरलाइन्सचे दोन वरिष्ठ क्रू सदस्य कॅनडात फरार

इस्लामाबाद – पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, ज्यामुळे लोकांना जगणे मुश्कील होत आहे. यामुळे ज्या लोकांना पाकिस्तानमधून बाहेर पडण्याची संधी मिळत आहे, ते पाकिस्तानमधून पळ काढत आहेत. आता तर चक्क पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) दोन वरिष्ठ क्रू सदस्य कॅनडात फरार झाले आहेत. या वृत्ताला पाकिस्तान सरकारने दुजोरा दिला आहे. खालिद महमूद आणि फैदा हुसैन अशी फरार झालेल्या क्रू सदस्यांची नावे आहेत.

इस्लामाबादहून पीआयएचे विमान कॅनडाच्या टोरंटोमध्ये उतरले. त्यानंतर दोन वरिष्ठ क्रू सदस्य लगेचच पळून गेले, असे पाकिस्तानी एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले. गेल्या वर्षीही अशाचप्रकारे पीआयएचे चार क्रू सदस्य फरार झाले होते. खालिद महमूद आणि फैदा हुसैन हे दोन क्रू सदस्य पीआयए फ्लाइट पीके ७७२ घेऊन इस्लामाबादहून कॅनडाला गेले होते. ते टोरंटोला पोहोचल्यानंतर परत पाकिस्तानला येण्याऐवजी तिथेच पळून गेले. इस्लामाबादला परतण्याच्या नियोजित वेळी, दोन वरिष्ठ क्रू सदस्य विमानात परतलेच नाहीत. त्यामुळे पाकिस्तान एअरलाइन्सला त्यांच्याशिवाय इस्लामाबादला परतावे लागले, असे पीआयएच्या प्रवक्त्याने सांगितले. टोरंटोमधील स्थानिक अधिकाऱ्यांना फरार झालेल्या पीआयएच्या दोन क्रू सदस्यांची माहिती देण्यात आली आहे. चौकशीनंतर या दोघांविरुद्ध कठोर विभागीय कारवाई सुरू केली जाईल आणि त्यांची सेवा समाप्त केली जाईल, असे पाकिस्तान सरकारने सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top