पाटगाव प्रकल्पाचे पाणी अदानींच्या कंपनीला दिल्यास जलसमाधी घेऊ

कोल्हापूर – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील अंजिवडे येथे अदानी कंपनीचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प प्रस्तावित आहे. पाण्यावरील वीज निर्मितीच्या या मेगा प्रकल्पासाठी भुदरगड तालुक्यातील पाटगाव प्रकल्पातून मोठ्या पाईपमधून पाणी नेले जाणार आहे.मात्र या प्रकल्पाचे पाणी या प्रकल्पाला दिल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा भुदरगड तालुक्यातील अनफ खुर्दच्या पाळ्याचा हुडा येथील अशोक मारुती सुतार यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.त्यांनी याबाबतचे निवेदन पालक मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,पाटगाव धरणाच्या पाण्यावर अदानी यांचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प प्रस्तावित आहे.या प्रकल्पातील पाणी भुदरगडसह कागल तालुक्यातील आणि सीमा भागातील जनतेच्या हक्काचे पाणी आहे.माजी आमदार स्वर्गीय हरिभाऊ कडव यांच्या दूरदृष्टीतून आणि अथक प्रयत्नातून हा प्रकल्प बांधला आहे.कडगाव प्रकल्पामुळेच वेदगंगा नदी बारमाही वाहते.त्यावर हजारो एकर जमीन अवलंबून आहे. हे पाणी प्रकल्पाला दिल्यास हजारो एकर जमीन बिनपाण्याची ओसाड पडून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. शेतकऱ्यांच्या हक्काचे एक थेंबही पाणी सिंधुदुर्गात न जाऊ देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने आपण विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी या शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top