पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर उद्या पादचारी दिन साजरा

पुणे- पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक या दरम्यान उद्या सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. या कालावधीत लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी आणि पार्किंगसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चौकादरम्यान पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता येणार आहे. महापालिकेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा केला जातो.
पादचाऱ्यांच्या सुविधेसाठी महामेट्रोकडून डेक्कन मेट्रो स्थानक ते महापालिका भवन स्थानक या दरम्यान सायकल उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता यावे, यासाठी वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. लक्ष्मी रस्त्याला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. पादचारी दिनाच्या निमित्ताने लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते गरूड गणपती चौक आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागात पदपथांची देखभाल दुरुस्ती करून पादचाऱ्यांना पदपथावरून विनाअडथळा चालता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. शहरातील शंभर महत्त्वाच्या चौकांत पादचारी सुरक्षेबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच उद्या विविध उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. ज्यांमध्ये लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षा कार्यशाळा, जुन्या पुण्याच्या विकासाबाबत पॅनल प्रदर्शन, अंध आणि अपंगांच्या सार्वत्रिक प्रवेशयोग्यतेसाठी कार्यशाळा, मानसिक आरोग्याबाबत पथनाट्य, पादचारी अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा, इतिहासप्रेमींसाठी शौर्य खेळ, संगीत आणि वाद्य कला सादरीकरण, हवेच्या गुणवत्तेची चाचणी यांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top